कोरोना विषाणूने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून देशात रोज दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक सिद्ध होत असून दररोजच्या मृतांचा आकडा वाढत आहे. नवीन स्ट्रेन प्रौढांसह लहान मुलं आणि तरुणांनाही कचाट्यात घेत आहे.
नवीन स्ट्रेनमध्ये वेगवेगळी जीवघेणी लक्षणेही दिसून येत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. यातील पाच लक्षणे ही अधिकच घातक असून ही लक्षणे दिसताच तात्काळ रुग्णालयात धाव घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कोणती आहेत ही लक्षणे जाणून घेऊया…
श्वास घेण्यास त्रास
श्वास घेण्यास त्रास किंवा छातीमध्ये वेदना हे संक्रमणाचे खतरनाक संकेत आहेत. कोरोना विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करताच शरीरातील सृदृढ पेशींवर हल्ला चढवतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
शरीरातील ऑक्सिजन पातळी
कोरोनाची लागण होताच शरीरातील ऑक्सिजन पातळी वेगाने खाली येऊ लागते. रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास त्याच्या फुफ्फुसातील एअर बॅगमध्ये फ्लूड (तरल पदार्थ) भरले जाते आणि शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होते. असे झाल्यास तात्काळ रुग्णालयात धाव घ्या.
चक्कर किंवा डोकेदुखी
कोरोनाच्या अनेक केसेसमध्ये रुग्णांचा मेंदू आणि नर्व्हस सिस्टीम यावर प्रभाव पडल्याचे दिसून आले आहे. रुग्णांमध्ये कन्फ्यूजन, आळस, घबराट, डोकेदुखी आणि चक्कर येणे यासारखी लक्षणे दिसली आहेत. तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा अचानक उच्चार अस्पष्ट झाले असतील तर डॉक्टरांना नक्की दाखवा.
छातीत वेदना
छातीत होणाऱ्या कोणत्याही वेदनेकडे दुर्लक्ष करू नका. कोरोना विषाणू फुफ्फुसावर हल्ला करत असल्याने छातीत वेदना होतात. छातीत वेदना होत असल्यास तात्काळ रुग्णालयात धाव घ्या आणि तपासणी करा.
ओठ निळे पडणे
अनेक केसेसमध्ये कोरोना रुग्णांचे ओठ निळे पडल्याचे आढळून आले आहे. शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचे हे संकेत आहेत. वैद्यकीय भाषेत याला ‘हायपोक्सिया’ असे म्हणतात. असे आढळल्यास डॉक्टरांना दाखवा.
‘ही’ आहेत सामान्य लक्षणे
दरम्यान, वरील लक्षणांव्यतिरिक्त ताप, खोकला, घशात खवखव, कफ, सर्दी, अंगदुखी, सांधेदुखी, तोंडाची चव जाणे, वास न येणे ही याची सामान्य लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करून घ्या.