राज्यातील एमएसआरटीसीच्या ई-तिकीटींग टेंडरमधील घोटाळा सध्या चर्चेत आहे. भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी हा घोटाळा समोर आणत यासंबंधीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेत राज्यपालांनी हे तक्रारपत्र लोकायुक्तांना दिले आहे. तसंच या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. दरम्यान, एमएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
एमएसआरटीसीच्या ऑनलाईन रिर्झव्हेशन सिस्टम आणि ई-तिकिटींग मशीच्या कॉन्ट्रॅटमध्ये 250 कोटींचा घोटाळा केल्याचे कोटेचा यांचे म्हणणे आहे. अहमदाबाद मधील एका कॉन्ट्रॅटरला साजेसे होणारे मोठे बदल एमएसआरटीसीच्या टेंडरमध्ये घडवण्यात आले होते, असे गंभीर आरोपही त्यांनी केले आहेत.
ई-तिकीटींग टेंडरसाठी बोली लावणाऱ्यांचे वार्षिक टर्नओव्हर 150 कोटी होते. मात्र त्यात फेरफार करुन ते 100 कोटी करण्यात आले. 3850 तिकीटींग मशीन हाताळण्याचा अनुभव कमी करुन 100 मशीन पर्यंत ठेवण्यात आला आहे. तसंच ऑनलाईन रिर्झव्हेशनचा अनुभव असणारा मुद्दा यातून काढून टाकण्यात आला होता, असे आरोप कोटेचा यांनी केले आहेत.
दरम्यान, आपल्याला आपल्या प्रशासनावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि या संबंधी प्रशासन योग्य तो निर्णय घेईल, अशी मला खात्री असल्याचेही कोटेचा यांनी म्हटले आहे.