सावधान ! पाषाण परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ.

0
slider_4552

पाषाण :

शहरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्ती असे वर्णन आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावासोबत दुचाकीवर प्रवास करताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 1 लाख 10 हजारांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास पाषाण परिसरातील सुतारवाडीत घडली. याप्रकरणी प्राची सुतार (24) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दुसऱ्या घटनेत दुचाकीवरून घरी जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 90 हजारांचे गंठण हिसकावून नेले आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पाषाणमधील बालाजी चौकात घडली आहे. याप्रकरणी सुजाता शिंदे (40) यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी या पाषाण बालाजी चौक भागात राहतात. त्या साडे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोपेडवरून घरी जात असताना बालाजी चौकातील एन.आय.व्ही प्रयोग शाळेच्या समोर आल्यानंतर पाठीमागून आलेल्या सोन साखळी चोरट्यानी त्यांच्या गळ्यातील 90 हजार रुपयांची सोन साखळी हिसकावून नेली आहे. यात देखील अचानक प्रकार घडल्याने फिर्यादी या घाबरून गाडीवरून खाली पडल्या होत्या.

सदर घटनेचा अधिक तपास पो.उप.निरी, मोहन जाधव, व सहा.पोलिस.निरीक्षक ,संतोष कोळी करत आहेत. दोन्ही चोरीच्या घटना काही वेळात घडल्यामुळे परिसरातून प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीस्वार महिलांना लक्ष्य करून दागिने हिसकावले जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

See also  सुतारवाडी, पाषाण, सुसरोड, बावधन परिसरातील कष्टकरी व्यवसायिकांना शिवसेनेचे वतीने दिवाळी भेट.