परिचारिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, बेमुदत संप पुकारण्याचा इशारा.

0
slider_4552

अकोला :

कोरोनाकाळात जीवाची बाजी लावून परिचारिकांनी रुग्णसेवा केली. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. राज्यातील परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य करा, अन्यथा २५ जूनपासून बेमुदत संप पुकारू, असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

सुरवातीला 21 व 22 जूनला सकाळी 8 ते 10 या वेळात काम बंद राहील आणि 23 व 24 जूनला पूर्णवेळ कामबंद करण्यात येणार आहे. तरीही मागण्या मान्य न झाल्यास 25 जून पासून बेमुदत काम बंद केलं जाईल. या संदर्भात शनिवारी जिल्हा परिचारिका संघटनेतर्फे अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता, आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

फेब्रुवारी २०२० पासून राज्यातील सर्व परिचारिका कोविड रुग्णांना सातत्याने जीवाची बाजी लावून सेवा देत आहेत. याकाळात इतर सर्व विभागातील कर्मचारी घरी बसून होते. परंतु, परिचारिकांनी आपल्या कुटुंबापासून, मुला-बाळांपासून दूर राहून रुग्णसेवा दिली. मागील वर्षी राज्यातील परिचारिकांनी अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. मात्र, अद्याप या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.

परिचारिकांचे मनुष्यबळ अत्यंत अपुरे आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावर काम करताना परिचारिकांवर प्रचंड ताण पडतो. कोरोना काळात शासनाने परिचारिकांची साप्ताहिक सुटीही बंद केली. जीवाची बाजी लावून लढणाऱ्या अनेक परिचारिकांकडे शासन अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करत असून, आता परिचारिकांच्या सहनशीलतेची सीमा संपली आहे, आता मागण्या मान्य करा, अन्यथा २५ जूनपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या :

परिचारिकांची पदे १०० टक्के भरावीत.

परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे ७,२०० रुपये जोखिम भत्ता देण्यात यावा.

क्वारंटाईन रजा व साप्ताहिक सुटी देण्यात यावी तसेच परिचारिकांचे पदनाम बदल करण्यात यावे

कोरोनाकाळात सर्व रजा स्थगित केल्यामुळे ३०० पेक्षा जास्त शिल्लक रजा रद्द होत आहेत. त्या शिल्लक ठेवण्याची व पुन्हा उपभोगण्याची परवानगी देण्यात यावी.

७ व्या वेतन आयोगाचे व महागाई भत्त्याचे थकीत हप्ते देण्यात यावेत.

See also  ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू राहील : पंकजा मुंडे