मुंबई :
राज्याच्या विकासकामात केंद्र सरकार ने अडथळा न आणता कांजूर कारशेडच्या वादावर चर्चेतून तोडगा काढू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केंद्र सरकारला केले.
करोनास्थितीचा आढावा घेतानाच मेट्रो कारशेडवरून केंद्र-राज्यात निर्माण झालेल्या वादंगावर भाष्य करीत, मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे रविवारी जनतेशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कांजूरमार्ग येथील जागेवर दावा सांगत केंद्राने केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. त्यामुळे बुलेट ट्रेनसाठीच्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्याची चाचपणी राज्य सरकारने करताच केंद्र-राज्य यांच्यात संघर्ष उभा राहिला.
भविष्यातील गरज लक्षात घेऊन आरेमधील कारशेड कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण केंद्र सरकार यात अडथळा आणत आहे. या प्रकल्पाच्या आड केंद्राने येऊ नये. राज्याच्या विकासाआड कोणालाही येऊ देणार नाही. विरोधकांनी माझ्यावर अहंकाराचा आरोप केला. हो, मुंबई आणि राज्याच्या हितासाठी मी जरूर अहंकारी आहे. असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
आरेची जागा फक्त मेट्रो-३ च्या मार्गिकेसाठी उपयुक्त आहे आणि इथल्या ३० हेक्टर जागेपैकी ५ हेक्टर जागेवर घनदाट जंगल आहे. म्हणजे २५ हेक्टर क्षेत्रावर आता कारशेड उभारायचे आणि भविष्यातली वाढती गरज लक्षात घेऊन ५ हेक्टरवरचे हे जंगल नष्ट करायचे असे पूर्वीच्या सरकारचे नियोजन होते. याउलट कांजूरमार्गला मेट्रो कारशेड उभारल्याने मेट्रो ३, ४ आणि ६ या मार्गाचे एकत्रीकरण शक्य होणार आहे. तसेच तिन्ही मार्गाचे कारडेपो एकत्र केल्याने या जंक्शनमधून अंबरनाथ-बदलापूपर्यंत मेट्रो मार्ग-१४ जाणार आहे. शिवाय कांजूरमार्गची ४० हेक्टरची जागा ही भविष्यातील कित्येक वर्षांच्या गरजा पूर्ण करू शकणार असल्याने कांजूरमार्गला मेट्रो कारशेड स्थलांतर केले, यात काय चुकले, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.