मुंबई :
बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाने अनेक कलाकारांची चौकशी झाली आहे. अनेकांना अटक देखील करण्यात आले होते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर या प्रकरणाने खूप वेग घेतला आणि एका पाठोपाठ अनेक कलाकारांची नावे समोर आली.
अशातच बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नाव ड्रग्ज प्रकरणात आले आहे.
रविवारी (३ ऑक्टोबर) आर्यनला अटक करण्यात आले आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर शनिवारी (२ ऑक्टोबर) एका क्रूज शिपमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकजण सहभागी होते. अशातच येथे रात्री पोलिसांची धाड पडली. पोलिसांना तेथे काही अमली पदार्थ सापडले. या सर्वांमध्ये शाहरुख खानच्या मुलाला देखील एनसीबीने ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत आणखी आठ जणांना देखील अटक करण्यात आले आहे. तसेच आर्यनचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
अशातच ही बातमी समोर आली आहे की, एनसीबीने आर्यनला त्याच्या मेडिकल चेकअपसाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये नेले आहे. यावेळी त्याला पोलिसांनी पकडून गाडीत घेऊन गेल्याचे समोर आले आहे. कोट्यावधींच्या गाडीतून नेहमी फिरणाऱ्या आर्यनला मराठी अधिकारी समीर वानखेडे बोलेरो गाडीतून घेऊन जाताना दिसत होता. विशेष म्हणजे समीर वानखेडे हा मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर हिचा पती आहे. दरम्यान बोलेरो गाडीतून आर्यनला घेऊन जाताना तिथे अनेकजण उपस्थित होते. त्यामुळे आता मेडिकल चेकअपमधून कोणत्या गोष्टी समोर येणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
यासोबत आर्यनला एक दिवस एनसीबी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याला आजची रात्र कोठडीत घालवावी लागणार आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी दोन दिवसांची कोठडी मागितली होती, परंतु कोर्टाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.