पंढरपूर:
पंढरपूरने भक्तीच्या शक्तीने मानवतेची ओळख करून दिली. लोक देवाकडे काही मागायला येत नाही. नुसत्या विठू माऊलीच्या दर्शनाने त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटतात, असं सांगतानाच भक्ती आणि शक्तीचं प्रतिक असलेलं पंढरपूर भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झालं पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंढरपूर पालखी मार्गाचे चौपादरीकरण भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. या मार्गाचे चौपदरीकरण होत आहे. पण त्यासाठी मला तुमच्याकडून तीन महत्त्वाच्या गोष्टी हव्या आहेत.
एक म्हणजे या मार्गाभोवती छाया देणारी रोपं लावा. म्हणजे या रोपांचं वृक्षात रुपांतर झाल्यावर या संपूर्ण महामार्गावर सावलीचं अच्छादन निर्माण होईल. त्याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा प्याऊ बांधा. वारीला येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना आणि प्रवाशांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे, त्यासाठी प्याऊ बांधा. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंढरपूरमध्ये स्वच्छता राखली गेलीच पाहिजे. जगातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ तीर्थक्षेत्रं कोणतं? असा सवाल कुणी केल्यास पंढरपूर हेच नाव समोर आलं पाहिजे, असं मोदी म्हणाले.
या भूमीपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री कपिल पाटील, रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे प्रदेश्याध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप आमदार खासदार उपस्थित होते.