पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ८०० शाळांमधील वीजबिल न भरल्याने कनेक्शन कट

0
slider_4552

पुणे :

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 800 शाळांमधील वीजबिल न भरल्याने त्यांचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. त्यापैकी 792 शाळांमधील वीज जोडणी खंडित करण्यात आली आहे, तर 128 शाळांमधील मीटरही काढण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील महावितरण कंपनीने ही कारवाई केली आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण 3639 जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी 2847 शाळांमध्ये वीजपुरवठा सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, या शाळांचे वीज बिल भरण्यासाठीही जिल्हा परिषदेकडे पैसे नाहीत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

ज्या शाळांचे वीज कनेक्शन महावितरणने कापले आहे, त्यापैकी 437 शाळा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात येतात. इंदापूरमध्ये 193, शिरूरमध्ये 146, मुळशीमध्ये 50, भोरमध्ये 74, दौंडमध्ये 52, खेडमध्ये 46, वेल्हामध्ये 32, आंबेगावमध्ये 34, बारामतीमध्ये 35, हवेलीमध्ये 13, जुन्नरमध्ये 41 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

करोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये जवळपास दोन वर्षे सर्व शाळा बंद होत्या. त्यादरम्यान अनेक ठिकाणी वीजबिल वाढल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. वीज बिल जास्त असल्याने जिल्हा परिषदेने ते भरले नाही. अशा स्थितीत वीज बिल न भरल्याने महावितरणने वीज कनेक्शन कापले आहे. माध्यमांनी ही बातमी दिल्यानंतर त्याची दखल जिल्हा परिषदेकडून घेण्यात आली आहे. अडीच कोटींचे थकीत लाईट बिल पुढील पंधरा दिवसात जिल्हा परिषद भरणार असल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष रणजित शिवतारे यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. असे असतानाही शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार दिवाळीच्या सुट्या 22 नोव्हेंबरपर्यंत वाढवून शिक्षण विभागाने शैक्षणिक क्षेत्राशी खेळ केला आहे, असा आरोप पालकांनी केला असून सुट्यांबाबतचा गोंधळ संपवून शाळा तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

See also  राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक : उद्धव ठाकरे