पुणे :
महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी (4 डिसेंबर) डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. यामध्ये आता आणखी सात जणांची भर पडली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सहा, तर पुण्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता आठ झाली आहे.
24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी 44 वर्षीय महिला पिंपरी-चिंचवडला आली. तिच्यासोबत आलेल्या तिच्या दोन मुली, पिंपरी-चिंचवडला राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन मुली अशा एकूण सहा जणांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे.
पुणे शहरातील 47 वर्षीय पुरुषालाही नवीन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितलं आहे.
नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला तिच्या 12 आणि 18 वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी पिंपरी-चिंचवडला आली. या तिघींच्याही प्रयोगशाळा नमुन्यात ओमिक्रॉन विषाणू आढळला. यानंतर त्यांच्या 13 निकटवर्तीयांची चाचणी करण्यात आली. यात महिलेचा भाऊ आणि त्याच्या दीड आणि सात वर्षांच्या मुलींनाही ओमिक्रॉनची बाधा झाल्याचं समोर आलं.
या सर्व रुग्णांवर जिजामाता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुणे शहरात आढळलेल्या रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर या काळात फिनलंड येथे गेला होता. 29 तारखेला त्याला ताप आला होता. त्याने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
आज (5 डिसेंबर) सकाळपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर संसर्गाच्यादृष्टीने अतिजोखमीच्या देशांमधून 4 हजार 901 प्रवासी दाखल झाले आहेत. तर इतर देशांमधून 23 हजार 320 प्रवासी आले.
गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागाला अवगत करावे असं आवाहन करण्यात आलं आहे.
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगीकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात शनिवारी (4 डिसेंबर) ओमिक्रॉनचा हिला रुग्ण आढळला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात हा रुग्ण राहत असून, तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आला होता.
24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडला.कोरोना ओमिक्रान व्हेरिएंटचे रुग्ण जगभरात अनेक ठिकाणी आढळून येत आहेत.