मुंबई :
राज्याचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार असून, २८ फेब्रवारी रोजी हे अधिवेशन सुरू होणार आहेत. याबाबतची घोषणा आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील अधिवेशन हे नागपुरात घेण्यात यावं अशी मागणी सातत्याने समोर येत होती. यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर ऐवजी मुंबईत होत असल्याने ही मागणी अधिकच जोर धरत होती. विधीमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक ही आज पार पडली. या बैठकीत आगामी अधिवेशनाबाबत चर्चा झाली.
ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून अधिवेशन नागपुरात होत नसल्याने विरोधी पक्ष नेत्यांकडून टीक टिप्पणी सुरू होती. शिवाय, महाविकास आघाडीमधील एक प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसकडूनही नागपुरात अधिवेशन व्हावे अशी मागणी केली जात होती. अखेर ही मागणी आता मान्य झाल्याचं दिसत आहे.
“अधिवेशाच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका बोटचेपी दिसत आहे. त्यांना प्रश्नांना सामोरं जायचं नाहीये हे स्पष्ट दिसत आहे. नागपूरात दोन वर्षे अधिवेशन झालं नाही. विदर्भातील लोकांची फसवणूक झाली आहे असं त्यांना वाटत आहे. मुख्यमंत्री प्रवास करू शकत नाही त्याबाबत सरकारने विनंती केल्याने आम्ही सकारात्मक भूमिका घेतली. पण अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपूरला घेण्याची मागणी आम्ही केली आहे. बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन अधिवेशन नागपूरला घेण्याचे आश्वासन सरकारने दिलं आहे.” असं फडणवीस यांनी आज सांगितलं होतं.