नागपूर :
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मोठी माहिती सामायिक केली आहे.
नागपूरसह देशातील इतर काही रेल्वेस्थानके अत्याधुनिक करून, विमानतळासारखे स्मार्ट केले जाणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या ‘स्मार्ट रेल्वेस्थानक’ Smart railway station या महत्त्वाकांक्षी योजनेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील रेल्वे स्थानकांचासुद्धा समावेश असणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. यात पुणे, मुंबई, नागपूर, दादर, सीएसटीएम या रेल्वे स्थानकांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. तसेच नागपूर, मुंबई आणि पुणे या शहरांचा पहिल्या टप्प्यात प्राधान्याने समावेश करण्यात आला असल्याचेही दानवे यांनी सांगितले.
औरंगाबाद येथील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी तीनही मंत्र्यांना बोलावून स्मार्ट रेल्वेस्थानक Smart railway station करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आगामी काळात देशातील रेल्वेस्थानक स्मार्ट Smart railway station करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
आज ज्याप्रमाणे विमानतळांवर सुविधा मिळतात, त्याप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीने रेल्वेस्थानकांचासुद्धा विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील काही रेल्वेस्थानके निवडली जाणार आहेत. पुढील एक महिन्यात याबाबत निविदा काढल्या जाणार असून, 2024 पर्यंत यातील काही रेल्वेस्थानक स्मार्ट रेल्वेस्थानक Smart railway station म्हणून लोकांच्या सेवेसाठी पूर्णपणे तयार राहतील, असे दानवे यांनी सांगितले. या स्मार्ट रेल्वेस्थानकात अद्ययावत आणि पर्यटकांसाठी विशेष सुविधांनी सज्ज असलेल्या इमारती असतील. तसेच याठिकाणी हॉटेल, मॉल यासारख्यासुद्धा असतील. आज ज्या पद्धतीने अद्ययावत विमानतळे आहेत त्याचप्रमाणे ही स्मार्ट रेल्वेस्थानक Smart railway station तयार करण्याचा संकल्प असल्याचे दानवे यांनी सांगितले.