पुणे :
महाराष्ट्र राज्यातील आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकी बरोबरच काही जिल्ह्या परिषदांच्या निवडणूका पण होणार आहेत. पुणे जिल्ह्या परिषदेची निवडणूक पण पुणे महानगरपालिका निवडणुकीबरोबर होणार आहे.
या पुणे जिल्ह्या परिषदेच्या निवडणुकीत पाच विद्यमान आणि माजी आमदारांचे पुत्र उतरणार आहेत. जिल्ह्यातील तब्बल पाच पेक्षा अधिक आजी-माजी आमदारांच्या मुलांचे व पुतण्याचे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आगमन होणार आहे.
आतापासूनच या आजी- माजी आमदारांनी जय्यत तयारी सुरु केली असून गट रचना आपल्या मुलांच्या सोयीची कशी होईल यासाठी या आजी-माजी आमदारांनी तयारी सुरु केली आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या या आमदारांच्या पुत्रांच्या लाँचिंग बद्दल भरपूर चर्चा रंगत आहे.
या पाच आजी-माजी आमदारांमध्ये इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा मुलगा राजवर्धन हर्षवर्धन पाटील हे दोघे इंदापूर मधून जिल्हा परिषद निवडणूक लढवायच्या तयारीत आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार आपला मुलगा ॠशीराज अशोक पवार याला पुणे जिल्ह्याच्या राजकारणात उतरवू इच्छित आहेत. यासोबतच दौंड तालुक्यातील माजी आमदार व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांचा मुलगा गणेश रमेश थोरात पण या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार आहे. तर खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी पुतण्या मयुर मोहिते-पाटील यांच्यासाठी पुढाकार घेतला आहे.