बीड :
बीड येथील सुमारे 2 एकरामध्ये पसरलेल्या सह्याद्री वनराईला आज भीषण आग लागली. या आगीत बऱ्याच झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. या धक्कादायक घटनेवरुन या वनराईला आग कोणी लावली हे अद्याप कळू शकलेले नाही.
बीड येथील सह्याद्री देवराई मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आली आहे. याच देवराईवरुन राज्यातील राजकारण मागील काही दिवसांपूर्वी चांगलंच तापलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञाताने या सदाबहार सह्यादी वनराईला आग लावली असल्याचे समोर आले आहे. आग विझविण्यासाठी चार ते पाच जणांनी मिळून शर्तीचे प्रयत्न केले. परंतु या आगीमुळे वनराईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जगातील पहिले वृक्ष संमेलन बीडच्या सह्याद्री देवराईमध्ये पार पडले होते.
सयाजी शिंदेंना चिंता, म्हणाले झाडांचे नुकसान झाले का
सिनेअभिनेता व सह्याद्री-देवराईचे प्रवर्तक सयाजी शिंदे यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांच्याशी संपर्क करून कशामुळे घटना घडली, झाडांचे नुकसान झाले का, याबाबत विचारणा केली. त्यावर खड्ड्यावर गवत नसल्याने झाडे सुरक्षित राहिल्याचे व दोन एकरातील गवत जळाल्याची माहिती मुंडे यांनी शिंदे यांना दिली.
बीडचे वैभव जपण्याची गरज
मागील चार वर्षांपासून पालवण परिसरातील वन विभागाच्या २०७ हेक्टर क्षेत्रात सयाजी शिंदे व सह्याद्री-देवराई परिवार आणि वन विभागाच्या सहकार्याने १ लाख ६४ हजार झाडे लावून हा परिसर फुलविण्याचा प्रयत्न पर्यावरणप्रेमींकडून सुरू आहे. या ठिकाणी प्रवेश करताना वन विभागाने सूचना फलक लावलेले आहेत. परिसरात फिरायला, सहलीला, वाढदिवस साजरा करायला अनेक जण येथे येतात. मात्र, शनिवारी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आता देखरेखीसाठी २४ तास कर्मचाऱ्याची नियुक्ती, तसेच येणाऱ्यांवर कठोर प्रतिबंध लावण्याची गरज असून, नागरिकांनीही वनसंपत्तीचे जतन व संरक्षण करण्याबाबत सकारात्मक राहण्याची गरज आहे.