औंध :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील ‘फोटोजर्नालिजम’ कोर्सच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ.नितीन कळमळकर यांच्याशी संवाद मुख्य इमारतीत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या असंख्य प्रश्नांना कुलगुरूंनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.एम.एस. उमराणी हेही यावेळी उपस्थित होते. कुलगुरूंचे नेमके अधिकार काय?, कोरोनाकाळातील आमच्या पदवीला महत्त्व असेल का? विद्यार्थी घडविण्यासाठी प्राध्यापकांनी भूमिका कशी असावी? यासह अशा अनेक विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन कुलगुरूंनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या ऐतिहासिक मुख्य इमारतीच्या आवारात काढलेले फोटो पाहून कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे कौतुक केले.
कुलगुरूंना भेटून, विद्यापीठाची ब्रिटिशकालीन इमारत आतून पाहून विद्यार्थी देखील प्रचंड खूष होते. अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांनी पत्रकारिते संबंधित विद्यापीठातील विभागांना भेटी दिल्या. यादरम्यान विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विद्यावाणी रेडिओ केंद्र(१०७.४ एफ.एम), मास मीडिया आणि कम्युनिकेशन विभाग व विभागाच्या प्रमुख डॉ.माधवी रेड्डी, शैक्षणिक व बहुमाध्यम संशोधन केंद्राचा स्टुडिओ आदींची भेट घेतली. पत्रकारितेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ तसेच त्यासंबंधी विभागांची माहिती व्हावी यासाठी कोर्सचे समन्वयक प्रा.चंद्रकांत बोरुडे यांच्या पुढाकाराने व प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.