नवी दिल्ली :
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. हातातून सत्ता गमावल्यानंतर आता पक्ष वाचवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर आव्हान आहे. यादरम्यान उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे.
लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. आजच शिंदे गटाच्या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली होती.
लोकसभा अध्यक्षांच्या भेटीदरम्यान 12 खासदारांनी निवेदनही दिले होते. त्यावेळी आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे खरे अनुयायी आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी लोकसभा अध्यक्षांनी या १२ खासदारांच्या स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राहुल शेवळे यांची लोकसभेतील पक्षनेता म्हणून निवड झाली तर भावना गवळी यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. शिंदे गटाची मोठी मागणी लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामुळे राजधानी दिल्लीत आज राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शिंदे गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊ शकतात. शिवसेनेवर पकड मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सत्ताबदलानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय खळबळ सुरुच आहे.
दरम्यान उद्या सुप्रिम कोर्टात राज्यातील या सत्तानाट्यावर सुनावणी पार पडणार आहे. एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार आहे, त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या गटातील १४ आमदारांवरही निलंबनाची टांगती तलवार आहे. उद्याच्या कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. एकनाथ शिंदे गटाने केलेल्या नियुक्त्या ही अवैध असल्याचीही याचिका उद्धव ठाकरेंनी दाखल केली आहे. सुप्रिम कोर्टाने यासाठी खंडपीठ स्थापन केले आहे.
दरम्यान भाजप आणि शिवसेना यांची युती होण्याची चर्चा सुरू झाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीसाठी तयारही होते. मात्र खासदार संजय राऊत यांनी युतीत खोडा घातला असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. युती करण्यात यावी यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो होतो. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यातही एक तास चर्चा झाली होती असेही शेवाळे म्हणाले.