बाणेर :
एशियन ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी – डेहराडून 2025 या स्पर्धेत बाणेर येथील स्वरा शिरीष कळमकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना 333 मीटर आणि 222 मीटर या दोन्ही क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे. या स्पर्धेत दहा ते बारा देश सहभागी झाले होते.
स्वरा ही इयत्ता तिसरी शिकत असून ऑर्चिड स्कूल बाणेर येथे शिक्षण घेत आहे. वयाच्या नवव्या वर्षीच सुवर्णपदक भारताला मिळवून दिल्याबद्दल बाणेरकरांना तिचा खूप अभिमान वाटतोय. तिच्या या दुहेरी सुवर्णंमय कामगिरीमुळे भारत देशाबरोबरच बाणेर गावचे नाव उज्वल झाले आहे.
त्याबद्दल तिचे कौतुक तिच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी बाणेर ग्रामस्थांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी बाणेर भैरवनाथ मंदिरामध्ये तिचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, अशोक मुरकुटे, बाबाजी शेळके, गणेश कळमकर, शिवाजी तुकाराम तापकीर, पुनम विधाते, जयेश मुरकुटे, गोविंद तापकीर, दिलीप कळमकर, अनिकेत मुरकुटे, योगेश तापकीर, अँड. आशिष ताम्हणे, मंगेश मुरकुटे अदी उपस्थित होते.
याबाबत बोलताना स्वराचे वडील शिरीष कळमकर यांनी सांगितले की, अवघ्या नवव्या वर्षातच तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याने आम्हाला तिचा खूप अभिमान वाटत आहे. स्केटिंग या खेळाचा सराव ती गेल्या दीड वर्षापासून करत आहे. तर आईस स्केटिंगचा सराव गेल्या तीन ते चार महिन्यापासूनच सुरू आहे. तिला या खेळात प्रशिक्षण करणारे सुयोग तापकीर व सुमित तापकीर यांनी ही तिला घडवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.