बाणेर :
ताश्कंद येथे झालेल्या ज्युनियर आशियायी वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल वडगाव मावळची कु.हर्षदा गरूड हिचा 25 हजार रुपये, तसेच कु.निकीता सुपेकर हिचा देशात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल 11 हजार रुपये आणि दहावी च्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या 18 विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 1 हजार रुपये, गरूड झेप मोहिम या संस्थेला आग्रा ते राजगड या 1253 किमी पायी मोहिमे करता 51 हजार रुपये देऊन संस्थेच्या वतीने यशदा मधील डॉ.बबनराव जोगदंड व निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त तथा संस्थेचे तज्ञ संचालक भानुप्रताप बर्गे यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, हर्षदा गरूड हिचा ताश्कंद येथे देशासाठी सुवर्ण पदक मिळवून पुण्यात आल्या नंतरचा पहिला सत्कार योगीराज पतसंस्थेच्या वतीने घेण्यात आला. संस्थेने बाणेर शाखेत दहावीच्या 18 विद्यार्थी व कृष्णानगर शाखेच्यावतीने वतीने 14 अश्या 32 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या 32 विद्यार्थ्यांनपैकी 15 गरीब विद्यार्थी निवडून त्यांना दरमहा 1 हजार रुपये शिष्यवृत्ती देणार आहोत. चालू वर्षी पासून संस्थेतील कर्मचा-यांना मुलांच्या शिक्षणासाठी प्रती वर्षी 10 हजार रुपये शैक्षणिक अनुदान सुरु करत असल्याचे यावेळी सांगितले. संस्थेच्या आर्थिक प्रगती आणि सामाजिक कार्याचा लेखाजोखा यावेळी त्यांनी मांडला. तसेच संस्थेला चालू वर्षी राज्यातील आदर्श पतसंस्था म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वात जास्त 97% मार्क मिळविलेली अनुश्री मैंद ही माझी नात असून तिच्या नावाने मी आज संस्थेत 1 लाख रुपयांची ठेव ठेवली आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
याप्रसंगी भानुप्रताप बर्गे यांनी मुलांनी भविष्यात चांगले शिक्षण घेऊन प्रगती करावी, परंतू आपले माता पिता, गुरुजन तसेच आपल्या गावची माती यांचा कधीही विसर पडू देऊ नये. गरीबीवर मात करुण माजी राष्ट्रपती डॉ.आब्दुल कलाम तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपआपल्या कर्तुत्ववान कामगिरी केली. या महान व्यक्तींचा आदर्श डोळयासमोर ठेऊन भविष्यातील वाटचाल करा असा मौलिक सल्ला दिला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.जोगदंड यांनी सांगितले की, शिक्षण आणि क्रिडा क्षेत्राला जेवढे महत्व आहे तेवढेच तुमचे मत इतरांसमोर मांडता आले पाहिजे.आजच्या युगात माहिती तंत्रज्ञानात पारंगत असणे गरजेचे आहे. आपण किती हुशार आहोत यापेक्षा आपण इतरांसमोर ते कसे मांडतो याला खुप महत्व आहे.
गरूड झेप मोहिमे करीता योगीराज पतसंस्थेची 51 हजार, अमोल बालवडकर यांनी 51 हजार, अशोक मुरकुटे यांनी 51 हजार, गणेश कळमकर यांनी 51 हजार, भानुप्रताप बर्गे यांनी 25 हजार, श्रीराम समर्थ पतसंस्थेच्या वतीने 25 हजार अशी एकूण यावेळी 2 लाख 54 हजारांची मदत करण्यात आली.
यावेळी मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अशोक मुरकुटे, भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, मा.सरपंच नारायण चांदेरे, गरूड झेप मोहीमेचे संस्थापक अध्यक्ष मारुती गोळे, उपाध्यक्ष दिग्विजय जेधे, हर्षदा गरूडचे कोच बिहारीलाल दुबे, डॉ.रियाज मुल्ला, शशिकांत पारखे, गणेश सायकर, अशोक रानवडे, योगेश तापकीर, संस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे तसेच सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
आलेल्या सर्वांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी मानले.