आंबिल ओढा सीमा भिंतीचे काम कधी पुर्ण होणार ?

0
slider_4552

पुणे :

आंबिल ओढा सीमा भिंतीच्या कामाचा आदेश देऊन पाच महिन्यांचा कालावधी झाला तरी ठेकेदाराने काम सुरू केले नाही. महापालिका प्रशासनाने ठेकदारावर कारवाई करण्याचे ठरवले. परंतु अचानक ही भूमिका बदलली असून, आता ठेकेदाराला काम सुरू करावे, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, पाच महिन्यांच्या उशीर झाला असताना महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी यावर काहीच बोलायला तयार नाहीत. उलट ठेकेदाराचा जोरदार पाहुणचार सुरू आहे.

आंबिल ओढ्याला आलेल्या पुरानंतर लगतच्या वस्त्या आणि सोसायट्यांच्या सीमाभिंतींचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्वरित निविदा प्रक्रिया राबवून काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही निविदा प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादाच्या भोवर्‍यात अडकली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने विकास आराखड्याप्रमाणे आंबिल ओढ्याची मोजणी करून काम सुरू करावे, अशी भूमिका घेतली होती. मात्र ठेकेदाराला आदेश देऊनही दिरंगाईमुळे काहीच काम झाले नाही.

यामुळे महापालिका प्रशासनाने कारवाईचे संकेत दिले होते. हे काम भागीदारीमध्ये करण्यात येणार असल्याने दोन्ही ठेकेदारांवर कारवाई होणार होती. मात्र अचानक महापालिका प्रशासनाची भूमिका बदलली आहे. ठेकेदाराने पण काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, पालिका प्रशासन कोणामुळे ठेकेदारावर मेहरबान झाले आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सर्वेक्षणा अगोदरच कामाला सुरुवात…..?

आंबिल ओढ्याला पूर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने आंबिल ओढ्याच्या कामासंदर्भात 300 कोटींचा आराखडा तयार केला. सीमाभिंतीचे काम करण्याआधी सर्व्हे ऑफ इंडियाकडून पाहणी करण्याचे काम करण्यात येणार होते. मात्र ही पाहणी व मोजणी करण्यात आली नाही. याऐवजी थेट पालिका प्रशासनाकडून कामाची निविदा काढण्यात आली. त्यामुळे ठेकेदाराचे हित साधण्यासाठी निविदा काढण्यात आल्या का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप म्हणाले, महापालिका प्रशासनाने आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीच्या कामाच्या निविदा काढल्या आहेत. यासाठी वर्कऑर्डरदेखील देण्यात आली आहे. ठेकेदाराकडून कामास दिरंगाई झाली असून, याबाबत ठेकेदाराकडे विचारणा करण्यात आली आहे. लवकरात लवकर काम सुरू करावे, अशा सूचना ठेकेदाराला दिल्याचे त्यांनी सांगितले.

See also  सर्व सामान्यांना आर्थिक मदत कशी मिळणार ? : चंद्रकांत पाटील