पुणे :
राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेल्या महापालिका निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.







या सर्व महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे, तर १६ जानेवारी २०२६ ला मतमोजणी होणार असल्याची घोषणा आयोगाने केली आहे. त्याबाबत पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप राष्ट्रवादी समोरासमोर लढणार असल्याची माहिती दिली आहे. पुण्यात विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. अशातच आज आयोगाने महापालिका निवडणूक तारखा जाहीर केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.
फडणवीस म्हणाले, पुण्यात भाजपने ५ वर्ष चांगला विकास केला आहे. आमचा जनतेवर विश्वास आहे. त्यामुळे जनता आम्हाला पुन्हा संधी देईल. मात्र पुण्याबाबत अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजप हे समोरसमोर लढतील. पण ती लढत मैत्रीपूर्ण असेल. जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महायुतीला फटका बसेल का? असं विचारल्यावर ते म्हणाले, मुंबई महापालिका आहे. कुठलाही फटका बसणार नाही. दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी किंवा नाही आले तरी आम्हाला फटका बसणार नाही. दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली. तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशा आमच्या महायुतीलाच निवडून देतील. कारण आमचा कारभार आम्ही केलेला विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्या सोबत राहतील.
१९ डिसेंबरला पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होणार या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, पृथ्वीराज बाबांसारखे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. PMO चे मंत्री राहिले आहेत. त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागले. तर मात्र निश्चितपणे मला असं वाटतं की, त्यामध्ये काहीतरी काळबेर आहे. पृथ्वीराजबाबा एक अतिशय चांगले नेते आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा विचार करून त्यांनी स्वतःला फार त्रास करून घेऊ नये. असा माझा त्यांना सल्ला आहे.







