शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला…

0
slider_4552

पिंपरी :

राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पुण्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असली, तरी महाविकास आघाडीत काँग्रेस वगळता अन्य पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दोन्ही पक्षांनी एकत्रित लढावी अशी तुषार कामठे यांची भूमिका आहे.

महापालिका निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये एकत्र येण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने पुण्यात राष्ट्रवादीसोबत युती न करण्याचा निर्णय घेतल्याने हे समीकरण अधिक बळकट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुती होणार नाही, तर भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढतील, मात्र ही लढत मैत्रीपूर्ण असेल.

दुसरीकडे, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याची तयारी दिसत आहे. काँग्रेस मात्र स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार आघाडी होऊ शकते.

या सर्व घडामोडींमध्ये तुषार कामठे आणि आझम पानसरे यांची अजित पवारांसोबतची भेट लक्षवेधी ठरली आहे. कामठे हे पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत, तर आझम पानसरे यांचा राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मोठा प्रभाव आहे. या भेटीमागे निवडणुकीसाठी जागावाटप किंवा एकत्र येण्याच्या चर्चा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

See also  शहरात डेंग्यूचे 67 तर झिकाचे 5 रुग्ण…