पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढविणार….

0
slider_4552

पिंपरी :

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढविणार आहे. आठ दिवसांत महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र तयार होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी महापाैर आझम पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (मनसे) आघाडीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराध्यक्ष तुषार कामठे, महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, प्रवक्ते माधव पाटील, जयंत शिंदे या वेळी उपस्थित होते. पानसरे म्हणाले, ‘आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि मनसे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविणार आहेत. याबाबत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आणि शहराध्यक्षांच्या बैठका झाल्या आहेत. त्यावेळी प्रत्येक प्रभागात महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे एकच चिन्ह कसे राहील, यावरही चर्चा झाली. प्रभागातील राजकीय ताकदीनुसार जागा सोडल्या जातील’.

‘महाविकास आघाडीबराेबर वंचितसह आदी पक्ष सोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. पुढील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे शहरात येणार आहेत. त्यानंतर शहरातील महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे शहराध्यक्ष एकत्रित बसून एक बैठक घेऊन जागा वाटपांचे सूत्र ठरणार आहे. महाविकास आघाडी सर्व १२८ जागांवर निवडणूक लढविणार’ असल्याचेही पानसरे यांनी स्पष्ट केले.

मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, ‘महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी संपर्क साधला होता. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल’.

मनसेकडून ५० जणांनी घेतले अर्ज

महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इच्छुकांना अर्ज देण्यास सुरुवात केली आहे. एका दिवसांत शहरातील विविध प्रभागांतून इच्छुकांनी ५० अर्ज नेले. शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, ‘शहरातील विकास, सामाजिक प्रश्न, पर्यावरण, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना राजकारणात संधी मिळावी यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. शहरातील विविध घटकांमध्ये समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती, वकील, डॉक्टर, साहित्यिक, पत्रकार, कलाकार, निसर्गप्रेमी यांनीही मनसेकडून निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा आहे. समाजातील अशा तळमळीच्या आणि कार्यशील व्यक्तींना अग्रस्थानी आणण्यावर मनसेचा भर आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या खऱ्या जनप्रतिनिधींना पुढे आणण्याचा आमचा संकल्प आहे’. मनसेचे अर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांनी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, मनसे सचिव रुपेश पटेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश