पुणे :
राज्यातील राजकारण्यांचे मतभेद हे मनभेदापर्यंत पोहोचले आहेत. राज्यात घडणाऱ्या विविध घटनांमुळे हे सातत्याने पुढे येत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाचे भिन्न विचारसरणी असलेले दोन नेते जर एकत्र आले तर काय होईल याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते.
त्यामुळे सहाजिकच या नेत्यांची भेट हा बातम्यांचा विषय ठरतो. भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याबाबतीतही आज असेच घडले. दोघेही पुणे येथील गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान एकत्र आले. आता काय घडणार असा सर्वच उपस्थितांना प्रश्न पडला पण दोन्ही नेते देवाच्या दारात अत्यंत साधेपणाने वागले.
चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र मिळून गणपती बाप्पा मोरया म्हटले आणि गणेश विसर्जन पालखीला खांदाही दिला. अलिकडील राजकीय वातावरणात ही दखलपात्र ठरावी अशीच घटना म्हणावी लागेल. त्याचे झाले असे, मुंबई प्रमाणेच पुणे आणि राज्यभरात गणपती विसर्जन केले जात आहे. पुण्यातील कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. या वेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही नेते एकाच वेळी पोहोचले. दोन्ही नेते जेव्हा आमनेसामने आले तेव्हा कोणीच कोणाला टाळले नाही. दोन्ही नेत्यांनी एकत्रच गणपती बाप्पा मोरया म्हटले. आणि दोघांनीही गणपतीची पालखी खांद्यावर घेतली.
शिवसेनेतील बंडाळीनंतर आदित्य ठाकरे हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबतच्या गाठीभेटी वाढवल्या आहेत. गणपती उत्सवादरम्यानही त्यांच्या गाठीभेटी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाल्या. पहिल्या टप्प्यात त्यांनी मुंबईतील गणपती मंडळांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पुण्याकडे वळवला. त्यांनी पुण्यातही जाणून गणपती मंडळांच्या गाठीभेटी घेत गणेशदर्शन केले. आदित्य ठाकरे यांना पाहताच अनेक तरुण-तरुणींनी त्यांना गराडा घातला. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेय युवक त्यांना गळ घालत होते.