पुणे :
मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या डीजे, लेझर लाईट तसेच ध्वनीप्रदुषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर तेलंगाना, मध्यप्रदेश या सरख्या राज्यांनी बंदी घातली आहे. महाराष्ट्रातही सोलापूर मध्ये डीजे वर बंदी घालण्याचा निर्णय तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. याच धर्तीवर पुणे शहर, जिल्हा तसेच महाराष्ट्रात ही डीजेवर बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी पोलीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी ई-मेल द्वारे पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, डीजेच्या कर्णकर्कश्य आवाजामुळे अनेक जणांना त्रास होतो. डीजेमुळे अनेकांच्या कानाला इजा होऊन अनेकांना कायमचे बहिरेपणा आल्याच्या देशभरातील अनेक घटना घडल्या आहेत. डीजेमुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. मागील वर्षी पुण्यात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेच्या आवाजामुळे ३ जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. डीजेवर बसून झेंडा फडकावत असताना विद्युत तारांच्या स्पर्श होऊन वडगावशेरी येथे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पैगंबर जयंती दरम्यान मागील वर्षी घडली होती.
गरोदर महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, आजारी माणसे यांना डीजेच्या आवाजाचा त्रास होतो. साऊंड सिस्टिम वापरण्यासाठी, त्याची आवाज मर्यादा किती असावी याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियमावली प्रसिद्ध केली आहे. मात्र त्याला गांभीर्याने घेतले जात नाही. डीजे सुरु असलेल्या मिरवणुकीसोबत चालताना बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस कर्मचार्यांना व अधिकाऱ्यांना सुद्धा याचा त्रास होतो, मात्र दुर्देवाने पोलीस सुद्धा यात बोटचेपी भूमिका घेतात याचे वाईट वाटते.
डीजे प्रमाणेच लेसर लाईटचे अनेक दुष्परिणाम आहेत. यामुळे अनेकांच्या डोळ्याला त्रास होतो. अनेकांना यामुळे कायमचे अंधत्व आले आहे. मागील वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या आगमन मिरवणुकीत कोल्हापूरमध्ये एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाली होती. यावेळी बंदोबस्तात असणाऱ्या अनेक पोलिसांना ही याचा त्रास झाला. सण उत्सवांच्या या बीभत्स प्रकारामुळे समाजावर अनिष्ट परिणाम होत आहे.
डीजेच्या तीव्र आवाजाचा धोका ओळखून अनेक राज्य यावर बंदी घालत आहेत. मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या डीजेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रमाणेच तेलंगण सरकारच्या वतीने हैद्राबाद पोलिस आयुक्तांनी ३० सप्टेबर २०२४ रोजी एक अद्यादेश काढून डीजे साउंड सिस्टम्स/डीजे साउंड मिक्सर/साउंड ॲम्प्लिफायर्स/ इतर उच्च ध्वनी उत्प्रेरक उपकरणे, मोठ्या आवाजाचे फटाके आदींचा वापर धार्मिक मिरवणुकीत करण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करण्याऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात येणार असून सबंधित व्यक्तीला ५ वर्षाचा तुरुंगवास आणि १ लाख रुपया पर्यंतचा दंडाची तरतूद त्यांनी केली आहे. तेलंगण प्रमाणे या वर्षी पासून सोलापूर मध्ये नागरिकांनी स्वयंस्फुर्थीने डीजे विरुद्ध चळवळ उभा केली. सोलापुरच्या जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांनीही सोलापुरात डीजे बंदीचा निर्णय घेतला आहे.
डीजे आणि लेसरवर बंदी घालावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. या विरोधात मी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ही दाखल केली आहे. त्यामुळे डीजेवर बंदी घालावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याप्रमाणे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाही निवेदनाद्वारे त्यांनी विनंती केली आहे.