बाणेर :
बाणेरमध्ये वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवरही आपली परंपरा आणि संस्कृती जपणारे विधाते कुटुंब आजही प्रामाणिकपणे शेती करत असून, बैलपोळ्याला ग्रामसंस्कृतीची झलक दाखवत असते. या कुटुंबाकडे कायमच सर्वात मोठ्या मापाची खिलार बैलजोडी असल्याने, दरवर्षी विधाते कुटुंबाचा बैलपोळा हा विशेष ठरतो.
बैलपोळ निमित्त पूनम विशाल विधाते यांनी आपल्या बैलजोडीचे प्रेमाने लोण्याने खांदे मळणी करून या सणाच्या परंपरेला मान दिला. त्यांचा मातीशी असलेला घट्ट संबंध आणि शेतीशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे बाणेर परिसरात विधाते कुटुंबाचा बैलपोळा नेहमीच आगळावेगळा स्वरूप घेतो.
विधाते कुटुंबाची शेतीशी असलेली नाळ आणि परंपरेशी असलेले नाते हे केवळ आजचे नाही, तर पिढ्यान् पिढ्यांचे वारसात आलेले आहे. पूनम विशाल विधाते यांचे सासरे, कै. बाबुराव चिंधू विधाते हे बाणेर गावातील मोठे प्रगतशील शेतकरी होते. शेतीतील नावीन्यपूर्ण विचार, परंपरेशी असलेले प्रेम आणि गावातील शेतकऱ्यांसाठी असलेली बांधिलकी यामुळे त्यांना विशेष ओळख प्राप्त झाली होती.
याचाच प्रत्यय २०१९ साली आला, जेव्हा त्यांच्या बैलजोडीला श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी चालत ओढण्याचा मान मिळाला होता. हा क्षण केवळ विधाते कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण बाणेर गावासाठी अभिमानाचा ठरला होता.
बैलपोळ्याच्या निमित्ताने पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या तालात आणि ग्रामसंस्कृतीच्या उत्साहात हा सण साजरा होणार असून, विधाते कुटुंबाचा हा बैलपोळा नेहमीप्रमाणेच ग्रामसंस्कृतीचे प्रतीक आणि परंपरेचा वारसा जपणारा उत्सव ठरेल.