बाणेर :
बाणेर येथील तुकाई टेकडीवर असलेल्या श्री तुकाई देवी मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या ठिकाणी नऊ दिवस वेगवेगळ्या रूपात देवीची सजावट आपणास पहावयास मिळणार आहे. काल पहिल्या दिवशी शैलपुत्री माता असे रूप तुकाई देवीला करण्यात आले होते तर आज दुसऱ्या दिवशी कमलवासिनी महालक्ष्मी रुप करण्यात आले होते.
तुकाई नवरात्र उत्सव २०२५ निमित्त दररोज सायंकाळी भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सलग नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. प्रामुख्याने शंखनाद, भारुड, गाव गाणी गावू, भक्ती गीते, संगीतमय सुंदरकांड, जागर स्त्री शक्तीचा सुर गृहलक्ष्मीचा, जागर अंबाबाईचा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भक्तांनी सर्वात महत्त्वाची नोंद घ्यावी असे ३० सप्टेंबर रोजी नवचंडी याग सकाळी ७ ते १२ पर्यंत चालणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त भक्तांनी सहभागी व्हावे असे आव्हान तुकाई माता मंदिराच्या वतीने शिवांजली कळमकर यांनी केले आहे.
पुण्याच्या पश्चिमेला बाणेर येथे टेकडीवर वसलेले आकर्षक मंदिरात वासल्यरुपी देवीचे दर्शन आपणास घडते. नवरात्रीत अनेक ठिकाणावरून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर बाणेर टेकडीवरून दिसणारे पूर्ण बाणेर गाव आपणास आकर्षित करते. वर्षभरात विविध उपक्रम या मंदिरात राबवले जातात.