येरवडा :
विविध आरोपाखाली मोक्का अंतर्गत अटक असलेले नाना गायकवाड सध्या येरवडा कारागृहात असून एका कैद्याने त्यांच्यावर पत्र्यासारख्या एका वस्तूने हल्ला केला आहे. या घटनेमुळे येरवडा कारागृहात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.3) सकाळी पावणे बाराच्या सुमारास खोली क्रं.1 समोर घडली आहे.
सुरेश बळीराम दयाळु असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कारागृह हवालदार सुभाष मानसिंग दरेकर (वय-54) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पावणे बाराच्या सुमारास खोली क्र. 1 आणि 12 येथे कैदी साफसफाई करत होते. त्यावेळी नाना गायकवाड हे खोली क्र. 1 समोर खुर्चीवर बसले होते. त्यावळी आरोपी सुरेश दयाळु याने फिर्यादी यांच्या पाठिमागून आला. त्याने पोलिसांची नजर चुकवुन लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने नाना गायकवाड यांच्या उजव्या गालावर वार केला.
कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. तर जखमी नाना गायकवाड यांना कारगृह रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपी सुरेश दयाळु याच्यावर आयपीसी 324 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
हल्लेखोर सुरेश दयाळु आणि नाना गायकवाड यांच्यात कोणत्या कारणावरुन वाद झाले हे अद्याप समजू शकले नाही.
मागील अनेक दिवसांपासून गायकवाड येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्यावर खंडणी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. आरोपीं विरुद्ध पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत.