थकीत वीजबिलांच्या वसुलीची मोहीम वेगात; शनिवारी, रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू

0
slider_4552

पुणे  :

पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 16 लाख 43 हजार 65 वीजग्राहकांकडे 354 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने वसूली मोहिमेला वेग देत वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 28) व रविवारी (दि. 29) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे.

गेल्या 25 दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 29 हजार 68 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्हा- 18 हजार 984, सातारा- 2 हजार 259, सोलापूर 3 हजार 335, कोल्हापूर- 2 हजार 578 आणि सांगली जिल्ह्यातील 1 हजार 912 थकबाकीदारांचा समावेश आहे.

पुणे प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- 222 कोटी 51 लाख रुपये (7,96,435), सातारा 22 कोटी 75 लाख (1,86,815), सोलापूर- 51 कोटी 72 लाख (2,62,170), सांगली- 26 कोटी 23 लाख (1,98,362) आणि कोल्हापूर जिल्ह्यात 30 कोटी 81 लाख रुपयांची (1,98,362) थकबाकी आहे.

वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. महावितरणची आर्थिक भिस्त केवळ वीजबिलांच्या वसुलीवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

See also  मुळशी तालुक्यातील अतुल मारणे यांची बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या कृषी नियामक मंडळावर नियुक्ती..