पुणे :
राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागाने (एनसीआरबी) यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार प्रती लाख लोकसंख्येमागे दखलपात्र गुन्ह्यांची नोंद ही सर्वात कमी कोलकत्ता येथे असून दुसऱ्या क्रमांकावर पुणे व तिसऱ्या क्रमांकावर हैद्राबाद येथे झाली आहे. यासंबंधीचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ‘भारतातील गुन्हेगारी 2022’ या शीर्षकाचा अहवाल 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांकडून गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे.







सलग तीन वर्षे कोलकताने प्रथम क्रमांक मिळवून ‘हॅट्रिक’ साधली आहे. अहवालानुसार, महानगरांमध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे दखलपात्र गुन्ह्यांची सर्वांत कमी नोंद कोलकत्यात झाली आहे.
कोलकत्यात प्रति लाख लोकसंख्येत दखलपात्र गुन्हे 86.7 नोंदविण्यात आले आहेत. पुण्यात हे प्रमाण 280.7 हैदराबादमध्ये 299.2 असे आहे. भारतीय दंडसंहिता (आयपीसी), विशेष आणि स्थानिक कायदे (एसएलएल) याअंतर्गत नोंदविले जाणारे गुन्हे हे दखलपात्र समजले जातात.
2022 च्या अकडेवारीनुसार जरी पुणे दुसऱ्या क्रमांकावर असले तरी 2021 च्या तुलनेत मात्र दाखल गुन्ह्यांमध्ये मात्र वाढ झाली (NCRB Report) आहे.‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार 2021 आणि 2023 मधील दखलपात्र गुन्हे (एक लाख लोकसंख्येमागे) कोलकत्ताची 2021 ची आकडेवारी 103.4 होती जी कमी होऊन 86.7 झाली आहे. तर पुण्याची आकडेवारी ही 2021 साली 256.8 होती जी वाढून 280.7 झाली आहे.
कोयता गॅंग, ड्रग्स माफिया, बेकायदा शस्त्राचा सुळसुळाट, खंडणी, बाल गुन्हेगारी अशा अनेक गुन्ह्यांना पुणे पोलिसांना आळा घालणे आवश्यक आहे. याबाबतीत पुणे पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य व पोलिसांचे प्रयत्न यातून गुन्हेगारी कमी करता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.








