पुणे :
पुण्याची वाहतूक कोंडी कधी सुटणार असा प्रश्न नेहमीच पुणेकरांना पडतो. वाहनांच्या वाढत्या संख्येचे कारण देत आणि अरुंद रस्त्यांकडे बोट दाखवत यंत्रणा वेळ मारून नेतात. मात्र, प्रत्यक्षात खरोखरीच किती प्रयत्न केले जातात याबाबत साशंकता असते. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याची वाहतूक समस्या ही आपल्या कामाच्या अग्रस्थानी ठेवली आहे. सर्व यंत्रणांना सोबत घेऊन कोंडीवर उपाय काढू असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. पोलीस आयुक्तालयामध्ये गुरुवारी पोलीस, महापालिका, महामेट्रो, टाटा मेट्रो, स्मार्ट सिटी, पीएमआरडीए आदी यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुणेकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले.
बैठकीला जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह पीएमआरडीएचे मुख्य अभियंता, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, महापलिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रकल्प विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला, यासोबतच महामेट्रो, टाटा मेट्रो (हिंजवडी-शिवाजीनगर), स्मार्ट सिटीचे अधिकारी, वाहतूक पोलीस निरीक्षक (नियोजन) राजकुमार शेरे, पोलीस निरीक्षक (वाहतूक प्रशासन) सुनील गवळी आदी अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर चर्चा करण्यात आली. ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांचा वेग वाढविण्यात यावा, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत केली जावी अशी सूचना पोलीस आयुक्तांनी केली. यासोबतच शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. या रस्त्यांवरील कामे, बेकायदा पार्किंग, बेकायदा वाहतूक यावर नियंत्रण आणण्यात येणार आहे. यासोबतच अतिक्रमणे देखील हटवली जाणार आहेत. पदपथ रिकामे केले जाण्याची आवश्यकता देखील नोंदविण्यात आली. शहारातील सिग्नल व्यवस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सिग्नलच्या वेळांचा ताळमेळ बसवणे, आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे देखील काम केले जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या ठिकयाआणी सुरू असलेली विविध कामे लवकरात लवकर पूर्ण केली जाणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच, शहरात सुरू असलेल्या खोदाई आणि पालिकेच्या कामांचा देखील आढावा घेण्यात आला. विविध चौकांमधील आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा देखील आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले.
महामेट्रोने पुणे शहर वाहतूक पोलिसांना २०० वॉर्डन दिले आहेत. महापालिकेकडून देखील वाहतूक पोलिसांना १७५ वॉर्डन पुरवण्यात येणार आहेत. आणखी काही वॉर्डन वाहतूक पोलिसांच्या मदतीकरिता मिळणार आहेत. त्यामुळे पोलिसांना वाहतूक नियमन आणि कोंडी फोडण्यासाठी मदत मिळणार आहे.