मुंबई :
बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळ्या झाडून घेत स्वतःला संपवले. त्याला कारागृहातून न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून स्वतःवर गोळ्या झाडल्या.
याबाबत माहिती अशी की, बदलापूरमध्ये एका शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन दोन मुलींवर शाळेतच अत्याचार झाला. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी शाळेचा कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे याला तात्काळ अटक केली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. या प्रकरणावरून झालेल्या गदारोळामुळे शासनाने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला.
त्याला सोमवारी (दि. 23) ट्रान्झिट रिमांडसाठी न्यायालयात नेले जात होते. त्यावेळी त्याने एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. त्यातून त्याने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. यामध्ये त्याला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
अक्षय शिंदे याला वाचवताना झालेल्या झटापटीत एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील एक गोळी लागली. त्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.