बाणेर :
बाणेर येथील सर्वे नंबर 288 मधील मंदिर हे श्री खंडोबा देवाचे असल्याचे 1967 सालच्या महसुली दप्तरातील कागदपत्रानुसार समोर आले आहे. कागदपत्राच्या चतुर सीमेमध्ये या मंदिराचा उल्लेख दिसून आल्यामुळे नेमका या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




बाणेर येथील कपिल मल्हार सोसायटी समोरील जागेमध्ये असलेले पुरातन मंदिर हे कोणत्या देवाचे आहे. याबाबत गेले अनेक वर्ष विविध प्रकारचे माहिती दिली जात होती. तर काही नागरिकांच्या माध्यमातून हे मंदिर भैरवनाथाचे पादुका मंदिर असल्याचे सांगितले जात होते. परंतु 1967 सालीच्या खरेदी खतातील महसुली दप्तरांमध्ये या मंदिराबाबत खंडोबाचे लहान देऊळ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
यामुळे गेले अनेक वर्ष हे मंदिर नक्की कोणत्या देवाचे याबाबत असलेल्या प्रश्नचिन्हाचे उत्तर या निमित्ताने समोर आले आहे. श्री खंडोबा हे मुरकुटे परिवाराचे कुलदैवत असल्यामुळे परिवारातील सदस्यांच्या श्री खंडोबा वरील भक्ती अथवा नवसामुळे या छोटेखानी मंदिराची खाजगी जागेत उभारणी करण्यात आली असावी.
बाणेरच्या कपिल मल्हार सोसायटी जवळील जागेमध्ये दगडी चौथर्यावर हे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे. परंतु हे मंदिर कोणत्या देवाचे होते याबाबत मात्र अद्याप पर्यंत संभ्रम होता. सध्या या मंदिरा समोर श्री भैरवनाथ पादुका मंदिर असा फलक लावण्यात आला आहे. परंतु हे मंदिर श्री खंडोबा देवाचे असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. यामुळे हे मंदिर श्री खंडोबा देवाचे असून याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आणखी शोध घेतला जात आहे.
डॉ. दिलीप मुरकुटे : हे मंदिर खंडोबाचे असून काही ग्रामस्थ जाणीवपूर्वक हे मंदिर भैरवनाथ पादुका स्थान आहे असा संभ्रम निर्माण करत होते. गेले अनेक दिवस या मंदिराबाबत चर्चा सुरू होती. परंतु याबाबत महसूल विभागाच्या कागदपत्र नुसार हे मंदिर खंडोबाचे आहे. मुरकुटे परिवाराचे कुलदैवत असल्याने आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी हे छोटे मंदिर उभारले आहे. सदर मंदिर हे खाजगी जागेत आहे. बाणेर मध्ये श्री भैरवनाथ पादुका स्थान हे बाणेर नागरी पतसंस्थे समोर पूर्वीपासून आहे. आजही बैलपोळ्या दिवशी त्या पादुका स्थानाला बैलांकडून प्रदक्षिणा मारली जाते.
सूर्यकांत मुरकुटे ( जागा मालक) : सदरील मंदिर हे मुरकुटे परिवाराच्या खाजगी जागेत आहे. आमच्या जागेच्या चतुर सीमेमध्ये या मंदिराचा उल्लेख खंडोबा मंदिर असा स्पष्टपणे केलेला आहे. भविष्यात या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा मानस मुरकुटे परिवाराचा आहे.








