बाणेर :
बाणेर, बालेवाडी, पाषाण आणि महाळुंगे परिसरातील वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येविरोधात शनिवारी संध्याकाळी नागरिक रस्त्यावर उतरून बालेवाडी फाटा येथे आंदोलन केले. हे आंदोलन बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडंट्स असोसिएशन (BBPRA) आणि बाणेर बालेवाडी नागरिक मंच (BBNM) यांच्या संयुक्त विद्रद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या आंदोलना प्रसंगी नागरिकांनी मशाली, दिवे, बॅटरी घेऊन आंदोलन केले व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.







पुण्यातील आयटी हबजवळ असल्याने बाणेर, बालेवाडी, पाषाण आणि महाळुंगे हे परिसर झपाट्याने विकसित होत आहेत. मोठ्या प्रमाणावर उंच निवासी इमारती, व्यावसायिक संक्ले आणि आयटी प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र या वाढत्या शहरीकरणाच्या तुलनेत मूलभूत पायाभूत सुविधा, विशेषतः वीज व्यवस्था, सक्षम करण्यात आलेली नाही.
नागरिकांनी सांगितले की, परिसरात आठवड्यातून तीन ते चार वेळा वीज पुरवठा खंडित होणे ही सामान्य बाब झाली आहे. अनेक वेळा तासन्तास वीज नसते, तर काही भागांमध्ये २४ तासांपर्यंत वीज पुरवठा बंद राहिल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सततच्या व्होल्टेज फ्लक्चुएशनमुळे नागरिकांच्या महागड्या विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.
मेट्रोच्या कामादरम्यान भूमिगत वीज केबल्सचे वारंवार नुकसान झाले असून त्यानंतर करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे दुरुस्ती काम ही समस्या अधिक गंभीर बनवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या आंदोलनादरम्यान नागरिकांनी निदर्शनास आणून दिले की, UDCPR धोरणामुळे परिसरातील बांधकामे अनेकपटीने वाढली असली तरी त्यासाठी आवश्यक वीज पायाभूत सुविधांचे नियोजन झालेले दिसत नाही. वाढत्या वीज वापराचा अंदाज, लोड प्लॅनिंग आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारणी न करता मोठ्या प्रमाणात बांधकाम परवानग्या दिल्या जात असल्याबाबत नागरिकांनी गंभीर चिंता व्यक्त केली.
नुसते नेत्यांचे आश्वासन नको तर सब स्टेशनचे काम पूर्ण करा…
बालेवाडी येथील सर्व्हे क्रमांक ४/१ भाग, ०.६५ एकर जागेवरील प्रस्तावित HV सबस्टेशनचे काम Maha Transco (महापारेषण) ने तातडीने सुरू करून प्राधान्याने पूर्ण करावे, अशी प्रमुख मागणी नागरिकांनी केली. सध्या संपूर्ण परिसर NCL आणि हिंजवडी सबस्टेशनवर अवलंबून असल्याने भविष्यातील गरजांसाठी नवीन सबस्टेशन अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.”








