म्हाळुंगे येथील मुख्य रस्ता, ड्रेनेज व पावसाळी लाईनचे काम त्वरित मार्गी लावा: उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

0
slider_4552

पुणे:

म्हाळुंगे गावातील मुख्य रस्त्याची दुरवस्था आणि ड्रेनेज यंत्रणेचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कामकाज मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर सकारात्मक पाऊल उचलत चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना फोन करून आवश्यक बजेट उपलब्ध करण्याचे तसेच कामे त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

ऑर्चिड हॉटेल ते व्ही. टी. पी. बांधकाम प्रकल्पापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, तसेच या भागात ड्रेनेज लाईन आणि पावसाळी लाईन टाकण्यात याव्यात, अशा प्रामुख्याने मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मंत्र्यांच्या सूचनेनुसार माजी सरपंच रेखा पाडाळे, माजी सरपंच नामदेवराव गोलांडे, गणेश कळमकर, उद्योजक सोपानराव पाडाळे आणि सुरेशराव पाडाळे यांच्या शिष्टमंडळाने महापौर मंजुषा नागपुरे व स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची भेट घेऊन प्रत्यक्ष निवेदन सादर केले.

या निवेदनाची तातडीने दखल घेत महापौरांनी अतिरिक्त आयुक्त दिवटे साहेब, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता बनकर साहेब आणि ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता गोजारे साहेब यांना या कामांना प्राधान्य देऊन त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

नागरिकांना दिलासा:

प्र प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, सध्या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवले जातील आणि पावसाळा संपताच रस्त्याचे डांबरीकरण तसेच ड्रेनेज व पावसाळी लाईन टाकण्याचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन नागरिकांना देण्यात आले आहे. यामुळे म्हाळुंगे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

See also  चार दिवसात दहा लाखाची उलाढाल: माॅडर्न गणेशखिंड मधे विक्रमी बिझनेस, गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात विविधा- प्रदर्शन व विक्री २०२५ हा कार्यक्रम संपन्न झाला.