पुण्यात रीलस्टार ‘लेडी बॉस’ माधवी कुंभारसह ७ जणांना अटक; जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

0
slider_4552

पुणे:

स्वतःला ‘लेडी बॉस’ म्हणवून घेत सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील रीलस्टार माधवी कुंभारला पोलिसांनी अटक केली आहे. डेक्कन परिसरातील एका कॅफेमध्ये एका १९ वर्षीय तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात दोन महिलांसह एकूण सात जणांना डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं? १५ ऑगस्ट रोजी पहाटे ३:१५ ते ३:४५ च्या सुमारास डेक्कन परिसरातील एका कॅफेमध्ये ही घटना घडली. आंबेगाव येथे राहणारा १९ वर्षीय रील क्रिएटर अथर्व जगताप याच्यावर टोळक्याने अचानक हल्ला केला. आरोपींनी प्लॅनिंग करून अथर्वला कॅफेमध्ये घेरले आणि त्याच्यावर कोयत्याने वार केले. यातील एक वार त्याच्या मानेवर बसल्याने तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी: अथर्वने दिलेल्या तक्रारीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

  • माधवी कुंभार (२३) आणि स्नेहल संजय सोनके (२०) – रा. काळेपडळ, हडपसर
  • राहुल वाघमारे (२०) आणि शिवानंद तलवार (२१) – रा. पिंपळे गुरव
  • आदित्य भालेराव (२२) आणि प्रियांश भोसले (२२) – रा. औंध
  • प्रेम साळवे (२२) – रा. बोपोडी

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काही जण डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह तर काही फ्लेक्स प्रिंटिंगचे काम करतात.

सोशल मीडियावरील वाद अन् कास पठारावरील घटना: अथर्व जगताप हा लक्झरी गाड्यांसोबत स्टंटचे रील्स बनवतो. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कास पठार येथे कार स्टंट करताना ओव्हरटेक करण्यावरून अथर्वचा दुसऱ्या गटासोबत वाद झाला होता. याशिवाय माधवी आणि अथर्व यांनी रील्सच्या माध्यमातून एकमेकांवर टीका टिप्पणी केली होती. या जुन्या वैमनस्यातूनच हा नियोजनबद्ध हल्ला करण्यात आल्याची माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी दिली.

See also  शहराच्या मध्यवर्ती भागात संविधान शिल्प उभा करावे ; सुनील माने यांची आयुक्तांकडे मागणी

पोलीस सध्या या दोघांमधील सोशल मीडियावरील संभाषण आणि मेसेजची तपासणी करत आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ४(२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.