प्रभाग ९ मधील विकासकामांचा निधी रद्द; चंद्रकांत पाटलांच्या राजकीय हस्तक्षेपातून जनतेवर अन्याय – अमोल बालवडकरांचा घणाघात

0
slider_4552

पुणे :

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील प्रस्तावित विकासकामांचा निधी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत फेरविचाराचा प्रस्ताव आणून रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय केवळ राजकीय वैमनस्यातून व भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्तक्षेपातून घेण्यात आल्याचा थेट आरोप मनपा स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

प्रभाग क्रमांक ९ मधील रस्ते, ड्रेनेज, उद्याने आणि इतर मूलभूत नागरी सुविधांच्या कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, राजकीय द्वेषापोटी हा निधी रद्द करून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या विकासकामांना खीळ घालण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी प्रभागातील कामांचे ‘स्पेशल ऑडिट’ करण्याचा प्रयत्न झाला आणि आता थेट निधीच रद्द करण्यात आला, असे बालवडकर यांनी स्पष्ट केले.

‘ना काम करुंगा, ना करने दुंगा’ भूमिका टीका करताना बालवडकर म्हणाले, “माझ्याशी राजकीय मतभेद असतील तर ते राजकीय पातळीवर लढले पाहिजेत. रस्ते आणि ड्रेनेज ही माझी वैयक्तिक कामे नसून जनतेची गरज आहे. स्वतः काम करायचे नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही, अशी ‘ना काम करुंगा, ना करने दुंगा’ अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.”

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरूच राहणार राजकीय अडथळ्यांमुळे विकासाची गती थांबणार नाही असा विश्वास व्यक्त करत बालवडकर पुढे म्हणाले, “स्व. अजितदादा पवार यांच्या विकासनिष्ठ विचारांचा वारसा पुढे नेत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार आणि खासदार पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग ९ मधील विकासकामे अधिक जोमाने सुरूच राहतील.”

महानगरपालिकेचा निधी हा नागरिकांच्या कररुपी पैशातून मिळणारा निधी आहे. त्यामुळे रद्द केलेल्या निधीचा निर्णय तातडीने मागे घेऊन सर्व विकासकामे पूर्ववत सुरू करावीत, अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली आहे.

See also  काल आनंद आज शोककळा... अपहरण झालेला मुलगा सुखरूप पोचल्यावर त्याला भेटायला येणाऱ्या आत्याचा अपघाती मृत्यू....!