महाळुंगे (पुणे):
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे झालेल्या भीषण अपघातात ११ वर्षीय विराज संदीप पाटोळे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि विराजला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महाळुंगे परिसरातील विविध सोसायट्यांमधील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. हातामध्ये मेणबत्त्या आणि मोबाईल टॉर्च लावून नागरिकांनी कॅन्डल मार्च काढत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.






महाळुंगे गावठाण आणि व्हीटीपी (VTP) सोसायटी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. जड वाहनांच्या सातत्यपूर्ण वाहतुकीमुळे रस्त्यांवर चिखल आणि निसरडेपणा निर्माण झाला आहे. या धोकादायक रस्त्यांमुळे रोज नागरिक घसरून जखमी होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
प्रशासनाच्या आश्वासनानंतरही परिस्थिती जैसे थे
काही आठवड्यांपूर्वीच स्थानिक नागरिकांनी खड्ड्यांच्या समस्येविरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. वारंवार तक्रारी करूनही पुणे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
“आणखी किती बळी घेणार?” नागरिकांचा सवाल
विराजच्या अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमधील असंतोष शिगेला पोहोचला आहे. हातात निषेधाचे फलक घेऊन नागरिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची, धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. “आणखी किती निष्पाप बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महापालिका आयुक्तांच्या भेटीची मागणी
पुणे महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः महाळुंगे परिसरात येऊन रस्त्यांची पाहणी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. या कॅन्डल मार्चमध्ये लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विराजच्या जाण्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने त्वरित पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे.








