वामा बिर्याणी क्वीन’ स्पर्धेत डॉ. शमा हवा यांनी पटकावला प्रथम क्रमांक; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
slider_4552

बाणेर (पुणे):

महिलांच्या पाककला कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींशी जोडण्याच्या उद्देशाने वामा वुमन्स क्लबच्या वतीने ‘वामा बिर्याणी क्वीन – Cooking Competition’ या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्लबच्या अध्यक्षा पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकारातून माऊली गार्डन, बाणेर येथे ही स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

पुणे शहरातील विविध भागांतून आलेल्या महिलांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेतला. सहभागी महिलांनी पारंपरिक व आधुनिक पद्धतींचा संगम साधत बिर्याणीचे विविध प्रकार सादर केले. बिर्याणीची चव, दर्जा, मसाल्यांचा सुयोग्य वापर, सादरीकरण आणि नावीन्य या निकषांवर परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली.

🏆 स्पर्धेचा अंतिम निकाल:

* प्रथम पारितोषिक: डॉ. शमा हवा

* द्वितीय पारितोषिक: भारती ढगे

* तृतीय पारितोषिक: नेहा गायकवाड

* चतुर्थ पारितोषिक: संजना मेंगे

* पाचवे पारितोषिक: दिव्या मयंक चंचलवाला

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 “महिलांच्या हातातील पाककलेचे कौशल्य केवळ घरापुरते मर्यादित न राहता त्याला व्यवसाय आणि आर्थिक स्वावलंबनाची जोड मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत सहभागी झालेली प्रत्येक महिला ही स्वतःमध्ये एक विजेती आहे.” पूनम विशाल विधाते (अध्यक्षा, वामा वुमन्स क्लब)

वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून भविष्यातही महिलांच्या कला, कौशल्य, आरोग्य, उद्योजकता आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबवले जातील, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. पूनम विधाते यांनी सर्व सहभागी, परीक्षक आणि आयोजकांचे आभार मानले.

See also  वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन