हैदबाद :
भारतात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना रशियाच्या स्पुटनिक- V लशीच्या दीड लाख डोसची पहिली बॅच भारतात दाखल झााली आहे. हैदराबादमध्ये ही पहिली बॅच दाखल झाली आहे.
यासंदर्भात स्पुटनिक V ने निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यात म्हटलं आहे, “स्पुटनिक V लसीची पहिली खेप हैदराबादला पोहोचली आहे. याच दिवशी भारताने सर्व प्रौढांच्या लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियानही सुरू केलं आहे. आपण एकत्रितपणे या जागतिक साथीला पराभूत करूया. एकत्र आल्याने आपली शक्ती वाढणार आहे.”
यावेळी रशियाचे भारतातले राजदूत निकोले कुदाशेव म्हणाले, “रशिया आणि भारत कोव्हिड-19 चा सामना करण्यासाठी एकत्र येऊन सातत्याने प्रयत्न करत आहेत. यावेळी हे पाऊल दुसऱ्या भयंकर लाटेला शमवण्यासाठी आणि प्राण वाचवण्यासाठीच्या भारत सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे.”
ते पुढे म्हणाले, “स्पुटनिक V जगातल्या इतर सर्व लशींमध्ये सर्वात प्रभावी आहे आणि ही लस कोव्हिड-19 च्या नव्या स्ट्रेनवरही परिणामकारक असेल. लवकरच स्थानिक पातळीवर या लसीचं उत्पादन सुरू होईल आणि हळूहळू दरवर्षी 85 कोटी डोस उत्पादन करण्याची योजना आहे.”
या लसीचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही लस 2 ते 8 अंश सेल्सियसवरही साठवता येते. त्यामुळे लसीची साठवणूक आणि वाहतूक खूप सोपी होते आणि लस वाया जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होतं.
"First batch of SputnikV vaccine arrives in #Hyderabad, India! That's the same day the country starts mass COVID vaccination drive covering its entire adult population. Let's jointly defeat this pandemic. Together we are stronger": Sputnik V pic.twitter.com/NCFbPpaWvA
— ANI (@ANI) May 1, 2021
प्रसार माध्यमांमधल्या रिपोर्ट्सनुसार या लसीचं मार्केटिंग करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) या रशियन कंपनीने भारतात स्पुटनिक V लसीचे 75 कोटींहून अधिक डोस उत्पादित करण्याचा करार केला आहे.
स्पुटनिक V लसीला भारतासह 60 देशांनी मंजुरी दिली आहे. RDIF कंपनीन भारतात या लसीच्या वितरणाससाठी डॉ. रेड्डीज लॅब आणि ग्लँड फार्मासह एकूण 5 कंपन्यांशी करार केला आहे.
स्पुटनिक V लसीचा दुसरा डोस 21 दिवसांनी देतात. स्पुटनिक V लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. इतर कुठल्याही कोव्हिड लसीचे दोन्ही डोस सारखेच असतात.