टाटा मेमोरियल सेंटरने (टीएमसी) नॅशनल कॅन्सर ग्रीड आणि नाव्या फाऊंडेशनच्या माध्यमातून परदेशातील दात्यांकडून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणले.

0
slider_4552

मुंबई :

देशात कोरोनाच्या आलेल्या दुसर्‍या लाटेमध्ये अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याने सरकारने रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यापार्श्वभूमीवर टाटा मेमोरियल सेंटरने (टीएमसी) नॅशनल कॅन्सर ग्रीड आणि नाव्या फाऊंडेशनच्या माध्यमातून परदेशातील विविध दात्यांकडून तब्बल साडेतीन हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर रविवारी भारतामध्ये आणले. हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देशातील विविध २०० रुग्णालयांना देण्यात येणार आहे. पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सट्रेटरबरोबरच परदेशातील दात्यांनी ८१ हजार किलोचे वैद्यकीय साहित्य आणि तीन लाख एन ९५ मास्क दिले आहेत.

कोरोना काळामध्ये कर्करोगाच्या रुग्णांची काळजी घेऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी टाटा रुग्णालयातर्फे अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई, नवी मुंबई, सिंगुर, वाराणसी, गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि मुझ्झफरापूर येथील टाटा मेमोरियल सेंटरच्या रुग्णालयातून तब्बल ८० हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर कोरोना काळात उपचार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाची लागण झालेल्या दोन हजार कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले. त्याचप्रमाणे पहिल्या लाटेमध्ये टीएमसीने मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या सहकार्‍याने ५१८ बेड, १० आयसीयू बेडचे कोविड सेंटर उभारले होते. त्याचप्रमाणे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये नागरिकांचा ऑक्सिजन अभावी होत असलेला मृत्यू लक्षात घेऊन टीएमसीने ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

त्यासाठी त्यांनी भारतातील टाटा ट्रस्ट आणि अन्य गैरसरकारी संस्थाच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध केले. त्याचप्रमाणे अमेरिकेतील बॉस्टन येथील डॉ. रमेश रामराजन आणि गितिका श्रीवास्तव यांच्या नाव्या संस्थेमार्फत त्यांनी परदेशातून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच न्यूयॉर्कमधील डॉ. पारुल शुक्ला, डॉ. राहुल शर्मा, डॉ. आनंद जोशी यांनी टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या मागणीनुसार अवघ्या तासाभरातच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्याचे मान्य केले.

परदेशातील दात्यांनी सढळ हस्ताने दिलेले कॉन्सट्रेटर हे देशातील विविध रुग्णालयांमध्ये पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये हे कॉन्सट्रेटर रत्नागिरीतील वालावलकर रुग्णालय, धुळ्यातील समर्थ कॅन्सर रुग्णालय, पुण्यातील सह्याद्री रुग्णालय, मुंबईतील टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालय, बीएआरसी रुग्णालय, सायन रुग्णालय, जे.जे. रुग्णालय, नवी मुंबईतील सिडको कोविड केंद्र, पनवेल जिल्हा रुग्णालय, कळंबोली कोविड केंद्र, प्रमोद महाजन कोविड रुग्णालय, मीरा भाईंदर महापालिका, आयएनएचएस अश्विनी आणि कैलास खेर फाऊंडेशनला देण्यात येणार आहेत.

See also  करोना मुळे परराज्यात जाणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांमध्ये वाढ.