नागपूर :
कोविड काळात राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असं नाही. अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करू नका. एकाच ऑक्सिजन सिलेंडर ४ जण फोटो काढतात हे चांगले नाही. त्यातून आपल्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतो. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे. हा खरा राजकारणाचा अर्थ आहे अशा शब्दात भाजपा नेते नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीस आणि कार्यकर्त्यांचे कान उपटले आहेत.
नागपूर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नितीन गडकरी म्हणाले की, नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच त्याचा भाग नाही, यावेळी गरिबांच्या मागे, समाजामागे धर्म, पक्ष विसरून मदत करा. त्याचे फळ पक्षाला नक्की मिळतं. वाईट काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलो तर ते कधीच विसरत नाही. राजकीयदृष्ट्या विरोधक असले तरी सगळ्यांच्या मागे उभं राहणं सामाजिक दायित्व आहे. मला कोविड होत नाही म्हणून काहीजण गाफील राहतात. आजही नेते, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी कोविडमध्ये बेफिकिरपणे वागतायेत असं त्यांनी म्हटलं.
तसेच अतिउत्साहीपणा करू नका. शक्यतो व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करा. कोणाच्या घरी जाऊ नका. तुम्ही जितकं सहजपणे घेता तसं घेऊ नका. जी कामं आहेत ती घरून करा. कार्यकर्त्यांना गमावणं पक्षाला परवडणारं नाही. आपला जीव वाचला तर पक्षाचं काम होईल. मी रोज सकाळी १ तास प्राणायम करतो. या व्यायामामुळे माझी तब्येत ठीक आहे. उर्जा वाढली. औषधं घेऊन तब्येतीची काळजी घेऊन कामं करतो. कामाच्या भावनेच्या भरात अनेकांनी काळजी घेतली नाही. पहिलं प्राधान्य आपलं आरोग्य, आपलं कुटुंब त्यानंतर पक्ष आणि समाजाचं काम करणं. स्वत:कडे लक्ष द्या. मला कोविड होत नाही अशा भ्रमात राहू नका. जे जे मला सांगत होते मला कोविड होत नाही त्या सगळ्यांना कोविड झाला. लसीकरणासाठी प्रयत्न करा. घराची, कुटुंबाची समाजाची काळजी घ्या असा सल्ला नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
दरम्यान, प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी. कोविड काळात अनेक कार्यकर्त्यांना गमावलं आहे. कोविडबाबत जे नियम लावले आहेत त्याचे अनुकरून तुम्ही स्वत:पासून करा. जनतेत जनजागृती करा. कोविड एकदा झाला म्हणजे पुन्हा होत नाही असं नाही. अनेक औषधांचे साईड इफेक्टही पाहायला मिळत आहेत. गरीब रुग्णांना मदत करून त्यांचे प्राण वाचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे असंही नितीन गडकरी म्हणाले.