पुणे :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लॉकडाऊनची घोषणा केली. 1 जूनपर्यंत असणारा लॉकडाऊन आता 15 दिवसांसाठी आणखी वाढवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रासह पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिका हद्दीमध्ये विकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. त्यानंतर आता पुण्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरू राहणार असून ही वेळ सोमवार ते शुक्रवार या दिवसांसाठी मर्यादित ठेवण्यात आली आहे. पुण्यातील आजची नव्या कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ही अवघ्या 180 वर आल्याने हळूहळू निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच आता महाराष्ट्रात काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ज्या भागातील पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा भागांमध्ये नागरिकांना निर्बंधांमधून शिथिलता देण्यात येईल, असं घोषित केलं आहे. तसेच ज्या भागांमध्ये 20 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे, अशा भागांमध्ये निर्बंध आणखी कडक केले जातील, असंही त्यांनी बोलून दाखवलं.