महाराष्ट्राच्या दोन विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार

0
slider_4552

नवी दिल्ली :

मनोज गुंजाळआणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी मनोज गुंजाळआणि अकोला येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी सपना बाबर यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त कोविड19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार २०१९-२०‘ चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती तर सुषमा स्वराज भवनातून युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, युवक कल्याण विभागाच्या सचिव उषा शर्मा आणि क्रीडा विभागाचे सचिव रवि मित्तल उपस्थित होते.

देशाच्या विविध भागातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी तीन श्रेणींमध्ये गौरविण्यात आले. यावेळी एकूण ४२ पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे येथील मनोज गुंजाळआणि अकोला येथील विद्यार्थिनी सपना बाबर यांनाही यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकांच्या श्रेणीत गौरविण्यात आले.

मनोज गुंजाळ यांनी जलसंरक्षण, हरितगाव, अवयवदान, प्रोढ साक्षरता, उज्ज्वला योजना, रक्तदान,वृक्षारोपन आदि कार्यक्रम व उपक्रमात सक्रिय सहभाग घेत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आपत्ती व्यवस्थापन विषयक हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनातही मनोज मुंजाळ यांनी महत्वाचा सहभाग दिला होता.

सपना बाबर यांनी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, तंबाखुमुक्त अभियान आणि रस्ता सुरक्षा जागरूकता या कार्यक्रमांमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. झोपडपट्टीतील जनतेला विविध जनोपयोगी उपक्रमात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच एड्स जागरुकता रॅली मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

See also  सर्व सरकारी बँकांचे खासगीकरण – पंतप्रधान.