पुणे :
कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौक येथील दुहेरी उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून लवकरच वाहतुकीसाठी कसा खुला होईल याकडे आपण लक्ष पुरवीत असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
मोहोळ यांनी असेही म्हटले आहे कि,’पुण्याच्या पश्चिम भागाच्या सुरळीत वाहतुकीसाठी वरदान ठरणाऱ्या नळ स्टॉप येथील दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाची मेट्रो अधिकारी, नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन मी आज आढावा घेतला. महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. ब्रीजेश दीक्षित, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, स्थानिक नगरसेवक जयंत भावे, माधुरीताई सहस्रबुद्धे, मंजुश्रीताई खर्डेकर, दीपक पोटे यांच्यासह महापालिका आणि मेट्रो अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून हा उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी सुरु होत आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या कडे असताना पश्चिम पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मी या दुहेरी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. शिवाय या कामाला गती यावी यासाठी सातत्याने पाठपुरावाही सुरु होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आता हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच काम पूर्ण होऊन वाहतूक सुरु होऊ शकेल.