मुंबई :
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील परेडमध्ये सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार मिळाला असून उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आले आहे.
तर सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्राच्या या चित्ररथावर पाच जैवविविधता मानकं दाखवण्यात आली होती. ज्यामध्ये १५ प्राणी आणि २२ वनस्पती आणि फुले या प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच यासाठी एक विशेष गाणेही तयार करण्यात आले होते. या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची असून याला आवाज प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला होता.
दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्यावतीने “महाराष्ट्रातील जैवविविधता मानके” या चित्ररथाचे राजपथावर झालेल्या पथसंचलनात सादरीकरण झाले होते. आज आपल्या चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रातील सर्व जनेतसाठी हा अभिमानाचा पुरस्कार आहे. या चित्ररथ निर्मितीसाठी संकल्पना सुचविणारे, सर्व सहभागी कलाकार, कारागीर व महाविकास आघाडी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन’, असे कोल्हे म्हणाले आहेत.