नवी दिल्ली :
लवकरच खरीप हंगाम सुरु होणार आहे. याकरिता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खतांची गरज भासणार आहे. खत निर्यात देश असलेल्या रशिया -युक्रेन यांच्या सध्या युद्ध सुरु असल्यामुळे खतांची मोठी टंचाई भासणार असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
अशावेळी केंद्र सरकार देखील देशातच खतांचे उत्पादन वाढवण्याच्या विचारात आहे. खतांचा पुरवठा करणाऱ्या अग्रेसर कंपनी पैकी एक असलेल्या इफको कडून नॅनो युरियाचे आणखी नवे चार प्लांट सुरु केले जाणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे खताच्या टंचाईवर तोडगा निघणार का ? असा सवाल उपस्थित होतो आहे.
इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (इफको) चे अध्यक्ष दिलीप संघानी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी इफकोच्या कामांची माहिती पंतप्रधानांना दिली. त्याच वेळी, बैठकीदरम्यान, इफको अध्यक्षांनी इफको नॅनो युरिया, भारतीय शेतकऱ्यांसाठी इफकोने स्वीकारलेल्या युरियाच्या नॅनो-तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमाच्या फायद्यांविषयी देखील माहिती दिली.तसेच नॅनो युरियाचे आणखी चार प्लांट संस्था उघडणार असल्याचे सांगितले. या बैठकीला इफ्को मार्केटिंगचे संचालक योगेंद्र कुमार उपस्थित होते. संघानी म्हणाले की, इफकोचे नवीन उत्पादन नॅनो युरिया हे भारतासह इतर देशांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी त्याचे फायदे सांगण्यात आले.
इफको अध्यक्ष म्हणाले की, नॅनो युरियाचे अनेक फायदे आहेत. ते किफायतशीर तसेच पर्यावरणपूरक आहे. त्याचबरोबर त्याची वाहतूकही सोपी आहे. यामुळे उत्पादनाचा दर्जा वाढल्याचे ते म्हणाले. दिलीप संघानी म्हणाले की, खरीप आणि रब्बी हंगामात देशभरातील विविध भौगोलिक आणि हवामानातील विविध पिकांवर नॅनो आधारित उत्पादनांच्या चाचण्यांमध्ये सक्रियपणे सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना या फायद्यांची माहिती देण्यात आली आहे.भारतीय शेतकऱ्यांनी हे चाचणी निकाल स्वीकारले आहेत. त्याच वेळी, इफको फेसबुक आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया चॅनेलद्वारे देखील याचा प्रचार करत आहे.
इफकोचे आणखी चार प्लांट सुरु होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती देताना दिलीप संघानी म्हणाले की, नॅनो युरियाचे भविष्य आणि उत्पादन याबाबत आम्ही पंतप्रधानांना माहिती दिली आहे. संघानी यांच्या मते, देशांतर्गत आणि परदेशी मागणी पूर्ण करण्यासाठी मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत इफकोकडे नॅनो युरियाचे उत्पादन करणारे एकूण 5 प्लांट असतील.
नवीन नॅनो युरिया प्लांट कुठे सुरू होणार
शेतकऱ्यांच्या विकासात नॅनो युरिया क्रांतिकारक ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने प्रगती होईल. सध्या कलोल, गुजराज येथे नॅनो युरियाचा एक प्लांट सुरू आहे. तर आणखी चार प्लांट सुरू होणार आहेत. नॅनो युरियाचे उत्पादन करणारी एकूण पाच प्लांट असतील. कलोल व्यतिरिक्त फुलपूर, आमला, परद्वीप आणि बंगळुरूचाही या यादीत समावेश आहे.
योगेंद्र कुमार, म्हणाले की आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले आहे की इफकोने यापूर्वीच 2 कोटींहून अधिक नॅनो युरियाच्या बाटल्यांचे उत्पादन केले आहे, अशा प्रकारे खरोखरच मेड इन इंडिया उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य केले गेले आहे. नॅनो युरिया निश्चितपणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची पूर्तता करेल आणि पंतप्रधानांच्या स्वावलंबी शेती आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाची पूर्तता करेल.