मुंबई :
इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. यातील ६९वा सामना शनिवारी (दि. २१ मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला.
वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ईशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविस ठरले. या विजयामुळे मुंबईने दिल्ली संघाला प्लेऑफमध्ये एंट्री करण्यापासून रोखले.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच, दिल्ली कॅपिटल्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या. हे आव्हान मुंबईने ५ विकेट्स गमावत पूर्ण केले. मुंबईच्या या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला चांगलाच फायदा झाला.
मुंबईकडून फलंदाजी करताना ईशान किशन याने ३५ चेंडूत ४८ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त डेवाल्ड ब्रेविसने ३३ चेंडूत ३७ धावांचे योगदान दिले. त्याने १ चौकार आणि ३ षटकार चोपले. तसेच, टीम डेविडने ३४ आणि तिलक वर्माने २१ धावा केल्या. मुंबईच्या रमणदीप सिंग याने विजयी चौकार मारत मुंबईला सामना जिंकून दिला. त्याने ६ चेंडूत १३ धावा केल्या.
यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना एन्रीच नॉर्किया आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच, कुलदीप यादवनेही १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून रोवमन पॉवेल याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने ३४ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार रिषभ पंत याने ३३ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. त्याने १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त फक्त पृथ्वी शॉ यालाच २० धावांचा आकडा पार करता आला. त्याने २४ धावांचे योगदान दिले. इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडा शिवता आला नाही.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह उजवा ठरला. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त रमणदीप सिंग याने २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, डॅनियल सॅम्स आणि मयंक मार्कंडेय यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवल्यामुळे दिल्ली संघाला प्लेऑफचे तिकीट मिळाले नाही. याउलट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.