बाणेर :
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने बाणेर युवा कबड्डी संघ आयोजित आणि पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर आणि माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या सौजन्याने आयोजीत करण्यात आलेल्या ५५ किलो वजन गट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी राष्ट्रीय खेळाडू अर्जुन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक २२/५/२०२२ रोजी संध्याकाळी अंतिम सामन्या नंतर होणार आहे.
यावेळी बोलताना भाजपा नेते गणेश कळमकर यांनी सांगितले की, बाणेर युवा कबड्डी संघाने प्रथमच स्पर्धा आयोजित करताना अतिशय चांगले नियोजन केले.५५ किलो वजन गटात स्पर्धा घेण्या मागचा उद्देश हा नविन युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना संधी मिळुन त्यांनी कबड्डी मध्ये यश संपादन करावे असा आहे. एक चांगला प्रयत्न बाणेर युवा संघाने केला पुढील काळात देखील या पेक्षा मोठया चांगल्या स्पर्धा बाणेर युवा संघाच्या माध्यमातुन घेवू व संघातील खेळाडूंना खेळासाठी हवी ती मदत करु असे आश्वासन या स्पर्धेच्या निमित्ताने देवुन स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धेला येणाऱ्या प्रेक्षक आणि खेळाडूंना बसण्यासाठी गॅलरी माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या वेळी बोलताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, जो कब्बडी खेळतो त्याला राजकारणात कधीच अडचण येत नाही. कधी कुणाची पकड घ्यायची, कधी बोनस घ्यायची हे बाळकडू कब्बडी खेळाडूला या खेळातून मिळते. खर तर खेळा मध्ये राजकारण नाही केले पाहिजे, परंतू आता राजकारणात कब्बडी खेळ चालू झाला आहे. पूर्वी कबड्डी सामने चालू होण्यापूर्वी लॉट पाडले जायचे. मग त्यात कळायचे आपल्याला कुठल्या संघाच्या विरोधात खेळायचे आहे, नंतर कबड्डीचे संघ टीम ए व टीम बी अशा दोन टीम घेऊन स्पर्धेत उतरू लागले. अ टीम मध्ये चांगले खेळाडू असायचे व ब टींमध्ये थोडे बरे खेळाडू असायचे ज्या गटात चांगले संघ आहेत त्या गटांमध्ये ब टीम दिली जायची व अ टीम कच्या टीम बरोबर सहज रित्या जिंकून जायची, अशाच प्रकारचा चुकीचा खेळ राजकारणात होतो. राजकारणातील होणारे हे कब्बडीचे खेळ थांबवले पाहिजेत. होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत अश्या प्रकारचे खेळ आपल्या परिसरात होणार आहेत. समोरील संघाने जरी लॉट चुकवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या सारखा कार्यकर्ता त्या टीम च्या समोरच येणारच आहे. आपल्याला आपला सांघिक खेळ दाखवायचा आहे. रेड करून बोनस घ्यायला मी इथे उभाच आहे.
यावेळी राष्ट्रीय खेळाडू अर्जुन शिंदे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, भाजपा राज्याचे नेते प्रल्हाद सायकर, युवा नेते लहू बालवडकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शिंदे, काँग्रेस युवा नेते जीवन चाकणकर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सह कार्यवाह दत्तात्रय कळमकर, बाणेर युवा कबड्डी संघाचे आधारस्तंभ दिनेश चाकणकर, गणेश चाकणकर, आणि सर्व खेळाडू उपस्थित होते.