मुंबई :
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा ७ गडी राखून पराभव केला.
दक्षिण आफिकेचा कर्णधार टेंबा बवूमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना २१२ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने सात गडी राखून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. वेन डर डूसेन आणि डेविड मिलर यांनी अर्धशतकीय खेळी करत दक्षिण आफ्रिकेला दणदणीत विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिकेचा डाव
भारताने दिलेल्या २१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि कर्णधार टेंबा बवूमा यांनी संघाला सावध सुरुवात करून दिली. कर्णधार टेंबा बवूमा १० धावांवर लवकरच बाद झाला. यानंतर ड्वेन प्रिटोरियस आणि डी कॉक यांनी भागीदारी रचत संघाची धावसंख्या वाढती ठेवली. ड्वेन प्रिटोरियसने वेगाने धावा करत १३ चेंडूत २९ धावांवर बाद झाला. यानंतर क्विंटन डी कॉक २२ धावा करून बाद झाला. फलंदाजीस आलेल्या वेन डर डूसेन आणि डेव्हिड मिलर यांनी नाबाद अर्धशतकीय खेळी खेळल्या. डेव्हिड मिलरने ३१ चेंडूत ५ षटकार ४ चौकारांच्या सहाय्याने ६४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. तर डूसेनने ४६ चेंडूत ५ षटकार आणि ७ चौकारांच्या सहाय्याने ७५ धावांची खेळी खेळली. या दोघांच्या नाबाद खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने भारतावर सहज विजय नोंदवला. भारताकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी १-१ गडी बाद करण्यात यश आले. भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी रोखण्यात यश आले नाही.
भारताचा डाव
दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघ मैदानावर उतरला. सलामीला ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनीही डावाची चांगली सुरुवात करत पावरप्लेमध्ये अर्धशतकी भागीदारी रचली. यानंतर ऋतुराज गायकवाड २३ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयश अय्यरने ईशान किशनसोबत संघाची धावसंख्या शंभरीपार पोहचवली. ईशान किशनने ४८ चेंडूत ३ षटकार आणि ११ चौकारांच्या सहाय्याने ७६ धावांची दमदार खेळी खेळली. आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजच्या फिरकित ईशान किशन फसला आणि बाद झाला. यानंतर श्रेयश अय्यरही ३६ धावा करून बाद झाला. कर्णधार ऋषभ पंत २९ धावा आणि हार्दिक पंड्या ३१ यांनी संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली. हार्दिक पंड्याने १२ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार यांच्या सहाय्याने ३१ धावांची तुफानी पारी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना केशव महाराज, एनरिक नॉर्किया आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
🚨 RESULT | #Proteas WIN BY 7 WICKETS
An incredible unbeaten 131-run partnership between David Miller (64*) and Rassie van der Dussen (75*) saw the #Proteas break the record books in Delhi to go 1-0 up in the 5-match T20I series#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/iYnibtADS1
— Cricket South Africa (@OfficialCSA) June 9, 2022