मुंबई :
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे शिंदे फडणवीस सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली होती. आता उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून मंत्रिमंडळाचं वाटप झालं आहे.
खाते वाटपानंतर भाजपचे फायरब्रँड नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.
शासकीय कार्यालयामध्ये आता हॅलो ऐवजी आता वंदे मातरम असं म्हणण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. 18 व्या शतकामध्ये दुरध्वनीच्या माध्यमातून सुरूवात हॅलो म्हणून व्हायची. आमच्या सर्वांसाठी वंदे मातरम हे उत्साह वाढवणारे शब्द आहेत. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
पुढच्या 26 जानेवारीपर्यंत प्रत्येकाची मानसिक तयारी अशी व्हावी की, ‘वंदे मातरम’पासून दिवसाची किंवा संवादाची सुरूवात व्हावी. विधानसभेच्या अधिवेशनाची सुरूवातही वंदे मातरमने मी करतो. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येकाने या अभियानामध्ये सहभागी व्हावं, असं आवाहनही मुनगंटीवार यांनी केलं आहे.
येत्या 18 तारखेला याबाबतचा अधिकृत जीआर काढणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. शिंदे सरकारमधील खातेवाटपामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे.