मुंबई :
सध्या वैद्यकीय महाविद्यालयातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरताना विलंब लागतो, त्यामुळे ही पदे भरण्यासाठी महाराष्ट्र सर्व्हिस कमिशन स्थापन करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत केली.
नवीन वैद्यकीय महाविद्यालयात पद भरती थांबली
सरळसेवा भरती आस्थापना मंडळ आणि स्थानिक निवड मंडळ या माध्यमातून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदे भरण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी आमदार नागो गाणार यांनी राज्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून नवीन महाविद्यालये सुरू केली असून या ठिकाणी पूर्णवेळ डॉक्टरांची पदे भरली जात नाहीत, एम सी आय आणि एनएमसीच्या निरिक्षणासाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केल्याने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळत नाही, असे नमूद केले.
एमपीएससी कडून विलंबाने पद भरती
त्यावर उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने भरणेबाबत शासन निर्णय २०२१ मध्ये काढण्यात आला. त्यानुसार २२ प्राध्यापक, ५६ सहयोगी प्राध्यापक आणि ७२ सहायक प्राध्यापक यांची भरती सुरू केली आहे. मात्र एमपीएससी कडून विलंबाने भरती होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सर्व्हिस कमिशनची स्थापना करण्यात येईल, असे मंत्री महाजन म्हणाले.